भारतानं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याआधीच क्रिकेटर रवींद्र जाडेजा सेलिब्रेशनच्या तयारीत आहे. गोंधळून जाण्याचे कारण नाही.. रवींद्र जाडेजा सध्या प्रचंड आनंदात आहे कारण तो बाबा झाला आहे. त्याला आजच मुलगी झाली आहे. ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा सध्या इंग्लंडमध्ये आहे. मात्र इकडे भारतात त्याची पत्नी रविनाने एका गोड कन्यारत्नाला जन्म दिला आहे. रविना आणि रवींद्र जाडेजा यांचे लग्न गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात झाले… आणि आता या दोघांनाही एक गोड मुलगी झाली आहे. मला माझ्या गरोदर बायकोला सोडून आयसीसी ट्रॉफीसाठी जावे लागते आहे पण मला माझ्या कुटुंबापेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे वाटते आहे, असे रवींद्र जाडेजाने स्टार स्पोर्टसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.. मात्र चांगला खेळ करुन मला माझ्या देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. माझ्या पत्नीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातले इतर सदस्य तिच्याजवळ आहेत असेही जाडेजाने म्हटले होते. रविनाला वर्षाच्या सुरूवातीलाच एक छोटासा अपघात झाला होता. मात्र त्यातून ती बचावली होती. तसंच तिच्या बाळालाही कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नव्हते. आता आज तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे जाडेजा सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असणार यात शंकाच नाही