भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या फलंदाजीला सहसा महत्त्व दिले जात नाही. त्याच्याकडे एक गोलंदाज म्हणूनच नेहमी पाहिले गेले आणि जास्तीत जास्त विकेट्सच्या अपेक्षा ठेवल्या गेल्या. पण गोलंदाजी प्रमाणेच आपण फलंदाजीतही कसे उजवे आहोत, हे जडेजाने अनेकदा सिद्ध करून दाखवले आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत आघाडीच्या दिशेने कूच करत असताना जडेजाने आपल्या फटकेबाजीने ५८ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी केली. जडेजाच्या झटपट फलंदाजीने भारतीय संघाला न्यूझीलंडसमोर ४०० धावांहून अधिक लक्ष्य ठेवता आले.

जडेजाने सामन्याच्या चौथ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आपल्या अनोख्या स्टाईलने त्याचे सेलिब्रेशन केले. अर्धशतक गाठल्यानंतर जडेजाने आपल्या बॅटने ‘तलवारबाजी’ करत आपला आनंद व्यक्त केला. जडेजाचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पॅव्हेलियनमधून कोहलीने जडेजाच्या अर्धशतकी खेळीला टाळ्यांची दाद दिली आणि जडेजाला माघारी बोलवून भारतीय संघाचा डाव घोषित केला. जडेजाचे तलवारबाजी सेलिब्रेशन पाहून पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या भारतीय खेळाडूंनाही हसू अनावर झाले होते, त्यांनी जडेजाला भरभरून दाद दिली.
जडेजाच्या या सेलिब्रेशनने भारत इंग्लंड दौऱयावर असतानाच्या एका सामन्याची आठवण क्रिकेटरसिकांना झाली. इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर भारतीय संघाच्या कसोटी विजयाचा तो ऐतिहासिक क्षण होता. रविंद्र जडेजाने त्यावेळी केवळ ५७ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडसमोर ३१९ धावांचे लक्ष्य ठेवता आले होते.

आपल्या अनोख्या सेलिब्रेशनबाबत बोलताना जडेजा म्हणाला की, आमच्याकडे सण आणि समारंभामध्ये ‘तलवारबाजी’चे साहसी प्रयोग केले जातात. तलवारबाजी करणाऱयांच्या दोन्ही हातात तलवार असतात आणि त्या साहसीरित्या फिरविल्या जातात. पण माझ्या फक्त एकाच हातात बॅट असते त्यामुळे ती मी एकाच हाताने फिरवतो. धोनीच्या नेतृत्त्वाखाली लॉर्ड्समध्ये मी अर्धशतकी खेळी केल्यानंतर पहिल्यांदा तसे सेलिब्रेशन केले होते. ते धोनीला आवडले होते. त्यानंतर मी हे असेच सेलिब्रेशन करायचे ठरवले. धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी हे सेलिब्रेशन खास त्याच्यासाठी होते. धोनीने नक्कीच हे पाहिले असेल, असेही जडेजा पुढे म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर रविंद्र जडेजाने केलेले सेलिब्रेशन-