रांची कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याची विकेट पाहण्यासारखी होती. भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाच्या फिरकीवर स्टीव्ह स्मिथ ‘क्लिनबोल्ड’ झाला. जडेजाने आपल्या नजाकती फिरकीने स्टीव्ह स्मिथला ‘मामा’ बनवलं. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला चेंडू बॅडऐवजी पॅडने खेळून काढण्याचा स्मिथचा प्रयत्न फसला. चेंडू थेट आतमध्ये येऊन यष्टीला आदळला आणि स्मिथ त्रिफळाचीत झाला.

स्मिथ बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष सुरू केला. विराट कोहली बाद झाल्यानंतर स्मिथ आणि मॅक्सवेल यांनी विराटच्या दुखापतीवरून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. कोहलीला पहिल्या डावात क्षेत्ररक्षणावेळी चौकार अडवताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कोहलीला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यानंतर भारताच्या डावात कोहली आपल्या नेहमीच्या क्रमांकावर फलंदाजीला आला पण तो अवघ्या ६ धावांवर स्मिथकरवी झेलबाद झाला होता. स्मिथने त्यावेळी कोहलीला खांद्याच्या दुखापतीवरून डिवचले होते. मग जडेजाच्या फिरकीवर काही कळण्याच्या आतच ‘क्लिनबोल्ड’ झालेल्या स्मिथला कोहलीनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.

रांची कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेरीस जडेजाने कांगारुंच्या दोन फलंदाजांना माघारी धाडून चांगला शेवट केला होता. वॉर्नर आणि लियॉन यांना बाद करून भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळवता आली. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथ हाच महत्त्वाचा अडथळा होता. त्याने रेनशॉनला हाताशी घेऊन मैदानात जम बसविण्यास सुरूवात केली होती. सामन्याच्या २९ व्या षटकात इशांत शर्माने संघाला यश मिळवून दिले आणि रेनशॉला पायचीत केले. मग कांगारुची अवस्था ३ बाद ५९ अशी केविलवाणी झाली. ऑस्ट्रेलियावर निर्माण झालेल्या याच दबावाचा पुरेपूर फायदा उचलत जडेजाने पुढच्या षटकात स्मिथची विकेट घेतली. जडेजाचा चेंडू नेमका कसा काय फिरला हेही स्मिथला कळलं नाही आणि तो तंबूत दाखल झाला.