कागदावर बलाढय़ वाटणाऱ्या संघाकडून कधी तरी कीव आणणारी कामगिरीही घडते, मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हेच नेमके रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. काही करून मोठे फटके मारायचा छंद जोपासत मुंबईने गगनभेदी फटके मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि बंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांचा फक्त ११५ धावांमध्ये खुर्दा उडवला. विजयासाठी आवश्यक असलेले आव्हान सात विकेट्स राखून पूर्ण करत त्यांनी मुंबईचा धुव्वा उडवला. सामनावीर पार्थिव पटेलचे अर्धशतक हे बंगळुरूच्या डावाचे आकर्षण ठरले.
बंगळुरूने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांनी मुंबईच्या फलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. सुरुवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला, पण सातत्याने विकेट्स पडत असताना अंबाती रायुडूचा (३५) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात मुंबईच्या फलंदाजांना बंगळुरूला विकेट्स आंदण दिल्यामुळे त्यांना ११५ धावाच करता आल्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला मुंबईने सुरुवातीला तीन धक्के दिले ते अवघ्या १७ धावांमध्ये. झहीर खानने या वेळी विराट कोहली आणि युवराज सिंग या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना एकही धाव करू न देता तंबूता रस्ता दाखवला. पण त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यात सपशेल अपयश आले आणि त्यांना सामना गमवावा लागला. पार्थिव पटेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी साकारत संघाला सुस्थितीत आणून विजयही मिळवून दिला. तर ए बी डी व्हिलियर्सने ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४५ धावांची खेळी साकारत पटेलला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद ११५. (अंबाती रायुडू ३५; युजवेंद्र चहल २/१७) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १७.३ षटकांत ३ बाद ११६ (पार्थिव पटेल नाबाद ५७)
सामनावीर : पार्थिव पटेल