सर्जिओ रामोस आणि गॅरेथ बॅले यांच्या गोलच्या बळावर रिअल माद्रिदने सॅन लॉरेन्झो संघाचा २-० असा पराभव करून पहिल्यांदाच क्लब विश्वचषकावर नाव कोरले. प्रत्येक सत्रात एक गोल करत रिअल माद्रिदने सर्व स्पर्धामध्ये सलग २२ सामने जिंकण्याची करामत केली. मॅराकेशच्या चाहत्यांनी युरोपियन विजेत्या रिअल माद्रिदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला, मात्र सॅन लॉरेन्झोकडून त्यांना कडवी लढत मिळाली नाही. ६५व्या मिनिटाला इमान्युएल मासची कामगिरी वगळता लॉरेन्झोकडून गोल करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रिअल माद्रिदचा गोलरक्षक आयकर कसिल्लासला फारसे कष्ट पडले नाहीत. ‘‘आमच्या कामगिरीचे फळ आम्हाला मिळाले. हा दिवस आमच्यासाठी संस्मरणीय ठरला. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून कठोर मेहनत घेत आहोत, त्यामुळे आमची सांघिक कामगिरी चांगली होत आहे,’’ असे रामोसने सांगितले.