रोनाल्डोच्या अनुपस्थितीत डेपोर्टिव्हो ला कोरुना संघावर मात

प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पध्रेत झोकात सुरुवात केली. गतविजेत्या माद्रिदने पहिल्याच लढतीत डेपोर्टिव्हो ला कोरुनावर ३-० असा सहज विजय मिळवला. गॅरेथ बेल, कॅसेमिरो आणि टोनी क्रुस यांनी प्रत्येकी एक गोल केला. मात्र, माद्रिदचा कर्णधार सर्गिओ रामोसला भरपाई वेळेत लाल कार्ड दाखवण्यात आले आणि त्यामुळे विजयी संघाचा जल्लोष ओसरला.

दहाव्या मिनिटाला डेपोर्टिव्होच्या फ्लोरीन अ‍ॅण्डनने गोल करण्याची संधी गमावली आणि माद्रिदचा गोलरक्षक कायलर नव्हासनेही अखेरच्या क्षणाला पेनल्टी स्ट्रोक अडवीत डेपोर्टिव्होची गोलपाटी कोरी ठेवली. स्पॅनिश सुपर चषक उंचावणाऱ्या माद्रिद संघांमध्ये प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी चार बदल केले.

माद्रिदची सामन्यातील सुरुवात संथ झाली आणि त्याचा फायदा उचलत फ्लोरिनने गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु नव्हासने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. २०व्या मिनिटाला बेलने माद्रिदला आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर डेपोर्टिव्होला डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही. करिम बेंझेमाच्या पासवर बेलने यंदाच्या मोसमातील पहिला गोल नोंदवला. सहा मिनिटानंतर अप्रतिम सांघिक खेळ करीत माद्रिदने ही आघाडी २-० अशी वाढवली. कॅसेमिरोने क्लबसाठी दुसरा गोल केला. मध्यंतरानंतर ६२व्या मिनिटाला बेलच्या पासवर क्रूसने गोल केला आणि माद्रिदने ३-० अशा आघाडीसह विजय निश्चित केला. भरपाई वेळेत रामोसने डेपोर्टिव्होच्या फॅबियन स्चरला मारले आणि सामनाधिकाऱ्यांनी त्याला थेट लाल कार्ड दाखवून बाहेर केले.

बार्सिलोनाची विजयाने श्रद्धांजली

बार्सिलोना शहरात दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना बार्सिलोना क्लबने रविवारी ला लिगा स्पध्रेतील पहिल्याच लढतीत विजय मिळवून श्रद्धांजली वाहिली. बार्सिलोनाने २-० अशा फरकाने रिअल बेटिजवर विजय मिळवला. ए. टोस्काचा (३६ मि.) स्वयंगोल आणि सेर्गि रोबेटरे (३९ मि.) याच्या गोलच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळवला.