पाच वर्षांचा दुष्काळ संपवला; मलगावर २-० अशी मात; गतविजेत्या बार्सिलोनाला उपविजेतेपद

रिअल माद्रिदने पाच वर्षांचा ला लिगा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. जेतेपदापासून केवळ एक गुणाने दूर असलेल्या माद्रिदने मध्यरात्री झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात मलगा क्लबवर २-० अशी मात केली आणि ला लिगा चषकावर मोहोर उमटवली. २०११-१२नंतर माद्रिदने पहिल्यांदा ला लिगा स्पर्धा जिंकण्याची किमया केली. त्यांचे हे ३३वे ला लिगा जेतेपद आहे.

जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या बार्सिलोनाने अखेरच्या लढतीत ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना आयबर क्लबला ४-२ असे नमवले, परंतु गतविजेत्या बार्सिलोनाला ३ गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  बार्सिलोनाच्या विजयात लिओनेल मेस्सीने दोन, तर लुईस सुआरेझने एक गोल केला.

माद्रिदने जेतेपदाच्या शर्यतीची उत्सुकता अखेपर्यंत न ताणता झटपट गोल करून बाजी मारली. माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. मध्यंतरानंतर करिम बेंझेमाने (५५ मि.) त्यात भर घालून माद्रिदचा विजय निश्चित केला. माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील ‘एल क्लासिको’ परतीच्या लढतीत माद्रिदच्या २-३ अशा नाटय़मय पराभवानंतर जेतेपदाच्या शर्यतीची चुरस वाढली. मात्र, त्यानंतर माद्रिदने विजयाचा सपाटा लावला आणि बार्सिलोना व त्यांच्यातील तीन गुणांचे अंतर कायम राखून जेतेपद आपल्याकडे खेचून आणले.

‘‘माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. आत्ताच्या घडीला येथे उभे राहून मला नृत्य करावेसे वाटत आहे. रिअल माद्रिदला मार्गदर्शन करताना तुमच्याकडून किती अपेक्षा असतील, याची जाण सर्वाना असेलच. खेळाडू म्हणूनही मी हा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळेच माझ्या व्यावसायिक आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा दिवस आहे,’’ असे माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी सांगितले.

विश्वचषक, युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा आणि चॅम्पियन्स लीग अशी जेतेपदे झिदान यांच्या नावावर आहेत, परंतु त्यांच्यासाठी ला लिगाचे जेतेपद हे विश्वचषक विजयापेक्षाही महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘‘या क्लबसोबत मी अनेक स्पर्धा जिंकल्या, परंतु ला लिगा जेतेपद हे त्यातील सर्वोत्तम जेतेपद आहे.’’

मलगावरील विजयानंतर माद्रिदच्या खेळाडूंनी थेट आपले शहर गाठले. मलगा येथील स्टेडियमवर जेतेपदाचा आनंद साजरा करताना सर्व खेळाडूंनी ३३ क्रमांकाची जर्सी परिधान केली. त्यानंतर क्लबसाठी बनवण्यात आलेल्या विशेष बसमधून संघाचे खेळाडू माद्रिद शहराच्या दिशेने रवाना झाले. या बसवर ३३ आकडा आणि चॅम्पियन्स असे लिहिले होते. बिगरछताच्या या बसमधून खेळाडूंची जंगी मिरवणूक काढण्यात आली आणि विजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी माद्रिदच्या फुटबॉलप्रेमींनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांसाठी पहाटे ३ वाजेपर्यंत ही मिरवणुक काढली.

०१ : व्हॅलेंसिया ने २००२ साली ला रोसालेडा येथे जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर ला रोसालेडा येथे ला लिगा जेतेपद पटकावणारा माद्रिद हा पहिलाच क्लब आहे.

२५ : बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीनंतर ला लिगाच्या सलग आठ मोसमात २५ किंवा त्याहून अधिक गोल करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा दुसरा खेळाडू ठरला आहे.

५८ : ला लिगाच्या प्रतिस्पर्धी क्लबच्या मैदानावर माद्रिदने एकूण ५८ गोल केले आणि एका मोसमातील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

२८ : १९८४सालानंतर झालेल्या ला लिगाच्या ३३ मोसमात बार्सिलोना (१५) आणि माद्रिद (१३) यांनी मिळून २८ जेतेपदे पटकावली आहेत.

३८ : रिअल माद्रिदने ला लिगाच्या सर्व ३८ साखळी सामन्यांत गोल करण्याचा विक्रम पहिल्यांदा केला आहे.

०४ : चार मोसमात ला लिगाच्या जेतेपदापासून वंचित राहणाऱ्या माद्रिदने हे अपयश पुसून टाकले. यापूर्वी १९९४साली त्यांनी चार मोसमातील अपयशानंतर जेतेपद पटकावले होते.