सचिन तेंडुलकरचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विदेशीय मालिका खेळवण्याची शक्यता धूसर दिसत आहे. पण जर दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी ही मालिका आदर्शवत मार्ग वाटत असेल तर दोन्ही देशांतील सरकाने त्याबाबतचा निर्णय घ्यावा. या मालिकेचा चेंडू आता दोन्ही सरकारच्या कोर्टात आहे. जर त्यांना ही मालिका योग्य वाटत असेल तर त्याबाबतचा निर्णय घ्यावा आणि मालिका सुरू करावी, असा स्ट्रेट ड्राइव्ह भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने लगावला आहे.
‘‘ भारत-पाक मालिकेबाबतचा निर्णय दोन्ही देशांतील सरकारने घ्यायला हवा, ’’ असे सचिन म्हणाला. भारत-पाक यांच्यातील द्विदेशीय मालिका डिसेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याबाबत दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांमध्ये सहमतीही झाली होती. पण काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान भारत भेटीवर आले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी त्यांची बैठक होणार होती. पण ही बैठक रद्द झाली आणि या मालिकेबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
दोन्ही देशांतील संबंधांबाबत तो म्हणाला की, ‘‘ दोन्ही देशांतील संबंध सुधारायला हवेत, असे मला वाटते. त्यासाठी क्रिके टहा एक आदर्शवत मार्ग असल्याचे दोन्ही देशांतील सरकारला वाटत असेल तर त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा आणि मालिका खेळवण्याला हिरवा कंदील द्यावा. या दोन्ही देशांमध्ये मालिका होऊ नये, असे कोणतेच कारण मला दिसत नाही. पण जर सरकारला तसे वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या निर्णयाचे पालन करावे.’’

क्रिकेटला ग्लोबल करण्याची गरज
क्रिकेट हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. पण हा खेळ अधिक ग्लोबल करण्याची गरज आहे. त्यासाठी विश्वचषकामध्ये अधिक संघांना खेळवण्याची गरज आहे, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
सचिन निवृत्त खेळाडूंच्या ‘क्रिकेट ऑल स्टार २०१५’ या लीगच्या प्रसारासाठी अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये क्रिकेटला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशीच सचिनची इच्छा आहे.
‘‘सध्या विश्वचषकामध्ये ८-१२ देशांचा सहभाग असतो. आतापर्यंत या संख्येमध्ये वाढ झालेली नाही. काही जणांच्या मते विश्वचषकामध्ये मोजके देश असायला हवे. पण त्यामुळे क्रिकेटचा विकास आणि प्रसार होऊ शकला नाही. जर जास्त संघ विश्वचषकात खेळायला लागले तर हा खेळ ग्लोबल होईल,’’ असे सचिन म्हणाला.