मेलबर्नमधील पदार्पणाच्या कसोटीत सपेशल अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलच्या कामगिरीवर सर्वानी टीका केली होती. पण पुढच्याच कसोटीत संधी मिळाल्यानंतर राहुलने त्या संधीचे सोने केले. ‘‘माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. पदार्पणाच्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वरच्या क्रमांकावर बढती मिळाल्याने मैदानावर स्थिरावण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. खेळपट्टीकडूनही चांगली मदत मिळत होती. प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करायचे, हे उद्दिष्ट मी ठेवले होते. आव्हानाचा सामना करताना आनंद होत होता. बुधवारच्या दिवसातील अखेरची २५ षटके खेळून काढल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला होता,’’ असेही त्याने सांगितले.