कोलकाता आणि नागपूरला होणाऱ्या आगामी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय जगदाळे यांनी सोमवारी दिली. परंतु भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रशिक्ष डंकन फ्लेचर यांच्या उपस्थितीत उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी फार बदल होतील, असे दिसत नाही.
भारताचा कर्णधार धोनी दुसऱ्या कसोटी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘‘फार बदल होतील, असे वाटत नाही. एक-दोन कसोटी सामन्यांच्या निकालावरून संघातील खेळाडू बदलणे योग्य ठरणार नाही. अन्यथा प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूच बदलत राहू. खेळाडूंना कामगिरी दाखविण्याची पुरेशी संधी द्यायला हवी, नाहीतर ते खेळापेक्षा जास्त फक्त निवडीचाच विचार करतील.’’
प्रग्यान ओझा, आर. अश्विन आणि हरभजन सिंग या भारताच्या फिरकी त्रिकुटाने अॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन यांना शतके झळकावण्याची संधी दिली. याचप्रमाणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडने चारशे धावांचा टप्पा ओलांडला. या पाश्र्वभूमीवर भारतीय फिरकीला वैविध्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने लेग-स्पिनर अमित मिश्राला संधी मिळू शकते.
दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेली भारतीय फलंदाजी मुंबई कसोटी सामन्यात अपेक्षेनुसार धावा करू शकली नाही. चेतेश्वर पुजाराने भारताच्या पहिल्या डावातील ३२७ धावसंख्येत १३५ धावांचे योगदान दिले. याचप्रमाणे दुसऱ्या डावात भारताच्या १४२ धावांमध्ये गौतम गंभीरने सूर गवसल्याची साक्ष देत ६५ धावा केल्या.
 तिसरा कसोटी सामना ५ ते ९ डिसेंबर आणि चौथा कसोटी सामना १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत खेळविण्यात येणार आहे.