शैलीदार समालोचनामुळे ‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिची बेनॉ यांचे गुरुवारी रात्री झोपेतच निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. बेनॉ गेली काही वष्रे त्वचेच्या कर्करोगाशी सामना करीत होते आणि २०१३मध्ये एका मोठय़ा कार अपघातातून ते बचावले होते.
फक्त १६ कमी..!
कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि दोनशे बळी घेण्याची किमया साधणारे बेनॉ हे पहिले क्रिकेटपटू. ६३ पाचदिवसीय सामन्यांच्या आपल्या कारकीर्दीत बेनॉ यांनी २७.०३च्या सरासरीने २४८ बळी आणि २४.४५च्या सरासरीने २२०१ धावा केल्या. १२२ ही त्यांची सर्वोच्च कसोटी धावसंख्या आहे. बेनॉने २८ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यापैकी एकसुद्धा मालिका ऑस्ट्रेलियाने गमावली नव्हती.
बेनॉ यांची भारताविरुद्ध गोलंदाजीची कामगिरी अप्रतिम होती. त्यांनी आठ कसोटी सामन्यांत ५२ बळी घेतले होते. १९५६मधील कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत त्यांनी २३ बळी घेतले होते. ७२ धावांत ७ बळी ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसुद्धा चेन्नईच साकारली होती. मग १९५९मधील भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी २९ बळी घेतले होते.
‘‘ऑस्ट्रेलियासाठी अतिशय दु:खद दिवस. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील महान खेळाडू आम्ही गमावला आहे. त्यांची कारकीर्द कौतुकास्पद अशीच होती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,’’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अ‍ॅबॉट यांनी ‘ट्विटर’वर व्यक्त केली. याचप्रमाणे बेनॉ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. या वेळी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रध्वज अध्र्यावर खाली उतरवण्यात येईल, असे अ‍ॅबॉट यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) शोक प्रकट करताना म्हटले आहे की, ‘‘जागतिक क्रिकेटने फक्त  आवाजच गमावला नाही, तर सर्वार्थाने सच्चा महान व्यक्ती गमावला आहे. तुझ्या स्मृती चिरंतन राहतील.’’
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने श्रद्धांजली प्रकट करताना म्हटले की, ‘‘बेनॉ यांच्या आवाजासोबतच आम्ही वाढलो. ते महान खेळाडू आणि कर्णधार होते. मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्यांच्या नेतृत्वाची झलक पाहायला मिळायची.’’

प्रसिध्द क्रिकेट समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिची बेनॉ यांचं गुरूवारी रात्री निधन झालं. सिडनी क्रिकेट मैदानाजवळ असलेल्या त्यांच्या पुतळ्यास चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय)
आदरांजली!
*रिकी एक जोशपूर्ण आणि प्रोत्साहक व्यक्तिमत्त्व. खेळाचे त्यांना परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्यासोबतचे अनेक क्षण मला आठवतात. गेल्या वर्षी आमची शेवटची भेट झाली. त्या वेळीसुद्धा भरभरून बोलले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाचे अतोनात नुकसान झाले आहे.
– सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू

*उत्तम व्यक्ती.. उत्तम क्रिकेटपटू.. आता सर्वोत्तम क्रिकेट समालोचक..
– मायकेल वॉन, इंग्लंडचे माजी कर्णधार

*रिची तुमच्या आवाजाचे आमच्या हृदयात स्थान आहे.
– डॅरेन सॅमी, वेस्ट इंडिजचा खेळाडू

*महान व्यक्तिमत्त्व. तुम्ही दिलेले योगदान क्रिकेट जगताला सदैव स्मरणात राहील.
– मिचेल जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज

*क्रिकेटपटू, समालोचक आणि व्यक्ती म्हणून बेनॉ सर्वोत्तम.
– शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू