क्रिकेटमध्ये अधिक समतोल राखावा, यासाठी खेळाचे नियम बनवणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे ठरवले आहे. एमसीसीच्या विश्व क्रिकेट समितीने याबाबत काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये बॅटचे आकारमान कमी करावे, लाल कार्डाचा अवलंब करावा, ऑलिम्पिकमध्ये खेळाच्या समावेशासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत.

याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) कळवण्यात आले आहे. या शिफारशी समितीने एससीसीकडे पाठवल्या असून त्यावर सहमती झाल्यावर १ ऑक्टोबर २०१७पासून या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या वेळी एमसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि इंग्लंडचे माजी कर्णधार मार्क ब्रेअर्ली, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा आणि एमसीसीचे क्रिकेट विभागाचे प्रमुख जॉन स्टीफन्सन यांनी नव्या शिफारशींबाबत मार्गदर्शन केले.

लाल कार्ड वापरणार

फुटबॉल आणि हॉकीसारखे आता क्रिकेटमध्येही ‘रेड कार्ड’ वापरले जाणार आहे. खेळाडूने पंचांशी हुज्जत घातली, प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगलट येण्याचा प्रयत्न केला किंवा पंच, अधिकारी, प्रेक्षकांबरोबर असभ्य वर्तन केल्यास ‘रेड कार्ड’ दिले जाईल आणि त्या खेळाडूला मैदान सोडावे लागेल.

बॅटच्या आकारमानाबाबत खेळाडू अनुकूल

चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य समतोल राखण्याचा एमसीसीचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी बॅटचे आकारमान कमी करण्यात येणार आहे. बॅटच्या कडा यापुढे ४० मि.मी. ठेवण्यात येईल, तर वक्रता ७ मि.मी. असेल. त्याचबरोबर बॅटची रुंदी ६७ मि.मी. ठेवण्यात येईल. जवळपास ६० टक्के खेळाडूंनी ही शिफारस मान्य केली आहे.

ऑलिम्पिक प्रवेश

एकीकडे अधिक देशांनी क्रिकेट खेळावे, यासाठी खेळाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी एमसीसी प्रयत्नशील आहे. २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करता येऊ शकतो, अशी एमसीसीला आशा आहे.

पाच दिवसांचीच कसोटी

कसोटी क्रिकेट अधिक रंजक करण्यासाठी चार दिवसांचाच सामना खेळवावा यावरही चर्चा करण्यात आली. पण पॉन्टिंग आणि राजा या दोघांनीही पाच दिवसांचाच कसोटी सामना असायला हवा, असे स्पष्ट मत व्यक्त केले. चार दिवसांचा सामना खेळवल्यास खेळ अधिक जलद होईल, पण काही संघ सामना अनिर्णीत सोडवण्यातच समाधान मानतील. त्यामुळे परंपरेनुसार पाच दिवसांचाच कसोटी सामना असावा, यावर या दोन्ही माजी कर्णधारांची सहमती झाली आहे.

चेंडू छेडछाडीच्या नियमांत बदल नाही

काही दिवसांमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या, पण एमसीसीने याबाबत नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर यावर कोणताही प्रकाशझोत एमसीसीकडून टाकण्यात आलेला नाही.