इंडियन प्रमिअर लीग(आयपील) या लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगऐवजी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्दने याची निवड करण्यात आली. मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. गेल्या दोन वर्षांपासून रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होता. पण त्याचा यंदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली नाही. पॉन्टिंगऐवजी यावेळी श्रीलंकेच्या महेला जयवर्दने याची मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच रिकी पॉन्टिंगने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. रिकी पॉन्टिंगकडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची एखादी मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सुधारणांकडे पूर्णपणे लक्ष देता यावे यासाठी रिकीने आयपीएलमधून प्रशिक्षकपदावरून माघार घेतल्याचे म्हटले जात आहे.

स्वत: रिकी पॉन्टिंग याबाबत म्हणाला की, माझ्या जवळ काही गोष्टींची विचारणा करण्यात आली आहे. डॅरेन लेहमन सध्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील सुधारणांकडे लक्ष देत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाचे प्रशिक्षकपद हाताळण्यासाठी एका अनुभवी क्रिकेटपटूची निवड समितीला गरज आहे. त्यासाठी माझी निवड व्हावी असे माझे मुळीच म्हणणे नाही, पण काही महिन्यांमध्ये नक्कीच मोठ्या घोषणेची दाट शक्यता आहे.

वाचा: ऑस्ट्रेलिया संघाच्या पुनर्वसनासाठी चॅपेल, हॉन्स यांना पाचारण

नुकतेच ऑस्ट्रेलियाला सलग पाच कसोटी सामन्यांमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे संघाचे पुनर्वसन करण्यासाठी माजी कर्णधार ग्रेग चॅपल आणि ट्रेव्हर हॉन्स यांची मदत क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी बुधवारी पदत्याग केला होता. त्यानंतर हॉन्स यांची समितीच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सध्या हॉन्स यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद असले तरी यानंतर माजी कर्णधार स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग आणि माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी या पदासाठी शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे. पॉन्टिंग नेटवर्क टेन वाहिनीवर केएफसी बिग बॅश लीगसाठी समालोचन देखील करतो. ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघाची जबाबदारी तो व्यवस्थितपणे सांभाळू शकतो, असेही अंदाज बांधले जात आहेत.

वाचा: ऑस्ट्रेलियाची संघनिवड चुकीची – शेन वॉर्न

रिकी पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा महत्त्वाचा दुवा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आणि कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या यादीत रिकीचे नाव अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने लागोपाठ तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरले होते, त्या संघात रिकी पॉन्टिंगचा समावेश होता. तर दोन वेळा रिकीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला आहे. रिकीने दोन वर्षे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षकपद भुषवले असून २०१५ साली रिकीच्याच प्रशिक्षकपदाखाली मुंबई इंडियन्सने स्पर्धेचे विजेतेपद देखील प्राप्त केले होते.