रशियन खेळाडूंना आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने परवानगी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तेजक प्रकरणावरून रशियन खेळाडू व संघटकांवर सरसकट बंदी घालण्याबाबत आयओसी ठाम होती मात्र अचानक त्यांनी पवित्रा बदलून रशियास ऑलिम्पिक प्रवेश दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका, कॅनडा यांच्यासह अनेक देशांनी रशियावर कठोर कारवाई करण्याबाबत सातत्याने मागणी केली होती.

अमेरिकेच्या उत्तेजक प्रतिबंधक समितीचे प्रमुख ट्रेव्हिस टायगार्ट यांनी आयसोसीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘क्रीडा क्षेत्र स्वच्छ करण्याच्या आयओसीच्या प्रक्रियेत हा खोडा घातला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक खेळाडू व संघटकांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे.’

न्यूझीलंडच्या उत्तेजकविरहित क्रीडा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रॅहॅम स्टील यांनी सांगितले, ‘आयओसीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्यामुळे त्यांच्यावरील विश्वासार्हता कमी होणार आहे.’

आयओसीच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघ (फिना), तसेच इटली ऑलिम्पिक समितीने स्वागत केले आहे. युरोपियन ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष पॅट हिके यांनी आयओसीच्या निर्णयास पाठिंबा व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘या निर्णयामुळे रशियाच्या निदरेष खेळाडूंवरील अन्याय दूर होणार आहे.’

राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष शेख अहमद अल फवाद अल सबाह यांनी सांगितले, सरसकट बंदी घातली असती तर निदरेष खेळाडूंवर अन्याय झाला असता. या निर्णयामुळे रशियन खेळाडूंचा सहभाग वाढणार असून त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा चुरशीने होईल.

वाडाकडून कडाडून टीका

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने आयओसीच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीचे सरसंचालक ऑलिव्हिर निग्गली यांनी सांगितले, ‘या निर्णयामुळे आयओसीबाबत खेळाडू व संघटकांमध्ये चुकीचा संदेश जाणार आहे. स्वच्छ प्रतिमेच्या खेळाडूंना अल्प संरक्षण तर उत्तेजकप्रकरणी दोषी असलेल्यांना मुक्तपणे वावरण्यास मुभा आयओसीने दिली आहे.’ रशियाचे क्रीडामंत्री व्हिटाली मुटको यांनी सांगितले, ‘आयओसीचा निर्णय सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.’