ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूला डेन्मार्कपाठोपाठ फ्रान्स सुपर सीरिज स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. याचप्रमाणे पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉयही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.

ऑलिम्पिक पदकानंतर सत्कार सोहळ्यांचा वर्षांव झालेल्या सिंधूला सरावासाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही. चीनच्या हे बिंगजाओने सहाव्या मानांकित सिंधूवर २२-२०, २१-१७ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि बिंगजाओ यांच्यात जोरदार मुकाबला रंगला. मात्र बिंगजिओने सरशी साधली. दुसऱ्या गेममध्ये झंझावाती खेळासह बिंगजिओने बाजी मारली. पुरुष गटात तैपेईच्या पाचव्या मानांकित चोयू तिआन चेनने प्रणॉयवर २१-१९, २१-१६ अशी मात केली.

 

भारताची स्पेनवर मात

व्हॅलेन्सिआ : भारताच्या कनिष्ठ संघाने चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत स्पेनवर ३-१ अशी मात केली व साखळी गटात आघाडीस्थान घेतले. अव्वल साखळी गटाच्या लढतीत भारताकडून परविंदरसिंग याने पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा संघाचे खाते उघडले. मात्र १६ व्या मिनिटाला स्पेनच्या गेरार्ड गार्सियाने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धातच भारताच्या नीलकांता शर्मा याने सामन्याच्या ३०व्या मिनिटाला गोल केला व संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

त्याचा सहकारी अरमान कुरेशीने ४१व्या मिनिटाला गोल करीत भारताची आघाडी ३-१ अशी केली. हीच आघाडी कायम ठेवीत त्यांनी सामनाजिंकला.

 

भारतीय महिला संघावर जर्मनीची मात 

ब्रुसेल्स : भारताच्या कनिष्ठ महिला संघाला पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत जर्मनीविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला.

चुरशीने झालेल्या सामन्यात एलिसिया ग्रेव्हने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बराच वेळ त्यांच्याकडे १-० अशी आघाडी होती.

पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना ज्योती गुप्ताने भारताकडून गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या ५८व्या मिनिटाला जर्मनीच्या ज्युलिया मेफेटने गोल करीत जर्मनीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी ठेवीत त्यांनी सामनाजिंकला.