आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून दिग्गजांकडून कौतुकास पात्र ठरलेला युवा क्रिकेटपटू ऋषभ पंतला यंदाची आयपीएल स्पर्धा चांगलीच फळली आहे. आयपीएलमधील कमाईतून ऋषभने आपली ड्रीम कार विकत घेतलीय. ऋषभच्या घरी आलिशान मर्सिडीज बेन्ज कार दाखल झाली आहे. नव्या कोऱ्या कार सोबतचे ऋषभचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने चमकदार कामगिरी केली. रणजीपाठोपाठ आयपीएलमध्येही ऋषभने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. दिल्लीकडून खेळताना १४ सामन्यांत ऋषभने ३६६ धावा केल्या, तर सुंदर यष्टीरक्षणाचा नमुना पेश केला. गुजरात लायन्सविरुद्धची अवघ्या ४३ चेंडूतील ९७ धावांची ऋषभची वादळी खेळी त्याच्यातील अफाट क्षमतेचे दर्शन घडवणारी होती. ऋषभच्या या मॅच विनिंग खेळीनंतर खुद्द सचिन तेंडुलकरनेही या युवा क्रिकेटपटूची दखल घेतली. सचिनने ऋषभचं तोंड भरून कौतुक केलं.

My Fav with my favorite Car

A post shared by Rishabh Pant FAN Culb (@rishabpant777) on

आयपीएल स्पर्धेला सुरूवात होत असतानाच ऋषभच्या वडिलांचं निधन झालं होतं. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही ऋषभने क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज खेळ करून सर्वांची वाहवा मिळवली. भारतीय संघाचा आश्वासक चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.