दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अवघ्या एका धावेने विजय मिळवणारा गुजरात लायन्सचा संघ आणि सनरायझर्स हैदराबादला नमवत विजयपथावर परतलेला रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा संघ समोरासमोर असणार आहेत. सहापैकी पाच सामन्यांत विजय मिळवत गुजरात लायन्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. पुण्याविरुद्धही अशीच कामगिरी करण्यासाठी ते आतूर आहेत.
ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ ही धडाकेबाज सलामीवीरांची जोडी लायन्ससाठी जमेची बाजू आहे. सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ड्वेन ब्राव्हो या मधल्या फळीतील फलंदाजांवर संयमी खेळी करण्याची जबाबदारी आहे. धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर गुजरातच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी केली आहे. धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, प्रवीण तांबे, ड्वेन ब्राव्हो पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. दुखापतीतून सावरल्यास आरोन फिंच जेम्स फॉकनरच्या जागी संघात पुनरागमन करू शकतो. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याच्या क्षमतेमुळे गुजरातने आतापर्यंत बलाढय़ संघांना पराभवाचा दणका दिला आहे. संघ संतुलनासाठी धडपडणाऱ्या पुण्याविरुद्ध दणदणीत विजय मिळवत सरासरी धावगतीत सुधारण्याचे गुजरातचे लक्ष्य आहे.
सनरायझर्स हैदराबादला चीतपट केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. अजिंक्य रहाणेने सातत्याने धावा केल्या आहेत, पण त्याला वेगवान धावगतीची जोड द्यावी लागेल. स्टीव्हन स्मिथकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. मिचेल मार्श, थिसारा परेरा आणि अ‍ॅल्बी मॉर्केल या अष्टपैलू त्रिकुटावरची जबाबदारी वाढली आहे. पुणे संघाचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करताना अशोक दिंडाने शानदार कामगिरी केली होती. रवीचंद्रन आणि मुरुगन अश्विन या जोडगोळीवर धावा रोखतानाच विकेट्स मिळण्याची दुहेरी जबाबदारी आहे.

थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स
वेळ : रात्री ८ पासून.

 

डू प्लेसिस दुखापतग्रस्त, उस्मान ख्वाजाचा समावेश
रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात उर्वरित लढती खेळू शकणार नाही. हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे डू प्लेसिसने माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचा पुणे संघात समावेश करण्यात आला आहे. केव्हिन पीटरसन आणि डू प्लेसिस माघारी परतल्याने पुण्याचे आव्हान कमकुवत झाले आहे.