स्थानिक निक कुर्यिगासचे आव्हान संपुष्टात; मारिन चिलीचही माघारी; व्हीनस विल्यम्स-गार्बिन म्युगुरुझा- युझेनी बोऊचार्डची आगेकूच

पस्तिशीतही जेतेपदाचा दावेदार असणाऱ्या रॉजर फेडररने सहजतेने विजय मिळवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत वाटचाल केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित अ‍ॅण्डी मरेनेही सरळ सेट्समध्ये विजय मिळवत तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले. सातवा मानांकित मारिन चिलीच आणि व्रात्य मुलगा अशी ओळख झालेला स्थानिक निक कुर्यिगास यांना दुसऱ्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. महिलांमध्ये अव्वल मानांकित अँजेलिक कर्बर, गार्बिन म्युगुरुझा, युझेनी बोऊचार्ड, व्हीनस विल्यम्स यांनीही तिसरी फेरी गाठली.

१७ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररला १७वे मानांकन देण्यात आले आहे. १८व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील फेडररने पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या नोहा रुबीनवर ७-५, ६-३, ७-६ (७-३) अशी मात केली. तिसऱ्या सेटमध्ये रुबीनने फेडररची सव्‍‌र्हिस भेदत मुकाबला चौथा सेटमध्ये जाईल अशी शक्यता निर्माण केली. मात्र फेडररने लौकिकाला साजेसा खेळ करत टायब्रेकरमध्ये बाजी मारली.

‘मी या स्पर्धेत अनेकदा खेळलो आहे. त्याचा मला फायदा झाला. नोहा गेली काही वर्षे चांगला खेळतो आहे. माझी सव्‍‌र्हिस अचूक झाली’, असे फेडररने सांगितले. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे फेडररला गेल्या वर्षांतील बहुतांशी स्पर्धामध्ये खेळताच आले नव्हते. त्याच्या निवृत्तीची चर्चाही सुरू झाली होती. जागतिक क्रमवारीत आणि मानांकनामध्ये फेडररची अव्वल दहामधून घसरण झाली आहे. मात्र या सगळ्याला बाजूला सारत फेडररने दिमाखदार पुनरागमन केले आहे.

दरम्यान पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीची पर्वा न करता अव्वल मानांकित अ‍ॅण्डी मरेने पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या आंद्रेय रुबलेव्हचा ६-३, ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत मरे सलग पाच अंतिम सामने खेळला आहे. मात्र प्रत्येक वेळी जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली आहे. यंदा जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मरे उत्सुक आहे. मात्र दुखापतीने दुसऱ्या फेरीच्या लढतीत मरेला चांगलेच सतावले. ‘घोटय़ाला झालेली दुखापत गंभीर नाही. मला खेळताना निश्चितच त्रास झाला. मात्र पुढच्या लढतीपर्यंत तंदुरुस्त होईन,’ असा विश्वास मरेने व्यक्त केला.

तृतीय मानांकित स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने स्टीव्ह जॉन्सनवर ६-३, ६-४, ६-४ अशी मात केली. बर्नार्ड टॉमिकने व्हिक्टर इस्त्रेला बुर्गोसचा ७-५, ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-५) असा पराभव केला. केई निशिकोरीने जेरेमी चार्डीला ६-३, ६-४, ६-३ असे नमवले. आंद्रेस सेप्पीने कुर्यिगासवर १-६, ६-७ (१-७), ६-४, ६-२, १०-८ असा विजय मिळवला. दोन सेट गमावल्यानंतरही जिद्दीने खेळ करत सेप्पीने सरशी साधली. जो विल्फ्रेड सोंगाने दुसान लाजोव्हिकला ६-२, ६-२, ६-३ असे नमवले.

व्हीनस विल्यम्सने स्टेफानी वोइगलेवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला. अव्वल मानांकित अँजेलिक कर्बरने कॅरिना विथोफ्टचा ६-२, ६-७ (३-७), ६-२ असा पराभव केला. गार्बिन म्युगुरुझाने समंथा क्रॉफर्डचे आव्हान ७-५, ६-४ असे संपुष्टात आणले. युझेनी बोऊचार्डने शुआई पेंगवर ७-६ (७-५), ६-२ अशी मात केली.

सानिया, बोपण्णाची विजयी सलामी

डेव्हिस चषकातून डच्चू मिळालेल्या रोहन बोपण्णाने पाब्लो क्युव्हेसच्या साथीने खेळताना थॉमझ बेल्युसी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ जोडीवर ६-४, ७-६ (७-४) असा विजय मिळवला. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरून घसरण झालेल्या सानिया मिर्झा आणि तिची सहकारी बाबरेरा स्ट्रायकोव्हा जोडीने जोक्लेन रे आणि अ‍ॅना स्मिथ जोडीवर ६-३, ६-१ अशी मात केली.