वयाच्या ३५ व्या वर्षी विम्बल्डन पटकावून नवा किर्तीमान रचणाऱ्या फेडररने पुढील पाच वर्षें खेळातील सातत्य कायम ठेवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम पटकावून टेनिस जगतात अधिराज्य गाजविणारा फेडररचे यंदाची विम्बल्डन स्पर्धा कदाचित शेवटची ठरेल, अशा चर्चा स्पर्धेच्या सुरुवातीपासून रंगल्याचे पाहायला मिळाले. मात्र वयाच्या चाळीशीपर्यंत कोर्टवर उतरणार असल्याचे सांगून फेडररने तूर्तास त्याच्या लाखो चाहत्यांना आणखी विक्रम करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे विम्बल्डनंतरच्या विक्रमी विजयानंतर तो मैदान सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदानंतर फेडररने आपल्या आवडत्या विम्बल्डन स्पर्धेसाठी विश्रांती घेतली.  वाढलेल्या वयातही ग्रासच्या मैदानात त्याने पुन्हा एकदा छाप सोडली. रविवारी रंगलेल्या सामना जिंकून त्याने वाढलेल्या वयाबाबतच्या चर्चेला छेद देत अजूनही टेनिसमध्ये बादशहा असल्याचे दाखवून दिले. विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक आठ जेतेपद पटकवणारा रॉजर फेडरर हा पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यात त्याने अनेक एक नव्हे तर तब्बल तीन विक्रम नोंदवले. स्पर्धेतील सर्वाधिक जेतपदासोबतच या स्पर्धेतील सर्वाधिक वयस्कर विजेता आणि एकही सेट न गमावता विम्बल्डन पटकवण्याचा करिश्मा फेडररने केला. सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम जिंकण्याची किमया फेडररने साधली असली तरी त्याला एका स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद मिळवण्याच्या यादीत नदाल अव्वल आहे. राफेल नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत १० वेळा जेतेपद पटकवले आहे.

विम्बल्डन स्पर्धेतील सर्वाधिक आठवे जेतेपद पटकावत रॉजर फेडररने  रेनशॉ आणि पीट सॅम्प्रस यांचा ७ जेतेपदांचा विक्रम मोडला. फेडररने याआधी २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ आणि २०१२मध्ये विम्बल्डन जेतेपद पटकावले होते.