‘आधुनिक टेनिसचा राजा’ अशी बिरुदावली भूषवणाऱ्या रॉजर फेडररला ‘याचि देही, याचि डोळा’ खेळताना पाहण्याची संधी भारतीय टेनिसरसिकांना मिळणार आहे. महेश भूपती निर्मित इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेतील दिल्लीच्या ‘इंडियन ऐसेस’ संघात दुखापतग्रस्त राफेल नदाल याच्याऐवजी रॉजर फेडररचा समावेश करण्यात आला आहे. लिलावानंतर जाहीर झालेल्या संघांमध्ये फेडररचा समावेश नव्हता.
 मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे नदालने माघार घेतल्याने त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असला तरी त्याची भरपाई फेडररच्या रुपात होणार असल्याने चित्र पालटले आहे.
‘‘नदालला दुखापत झाली आहे. पण फेडरर उपलब्ध असल्याने मला आनंद झाला आहे. फेडरर महान खेळाडू आहे आणि संपूर्ण जगभर त्याचा चाहतावर्ग पसरलेला आहे. त्याच्या उपस्थितीने लीगच्या लोकप्रियतेला नवा आयाम मिळणार आहे,’’ असे या लीगचे जनक महेश भूपतीने सांगितले.
दिल्लीच्या संघात फेडररसह पीट सॅम्प्रस, अ‍ॅना इव्हानोव्हिक, गेइल मॉनफिल्स, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा समावेश आहे. फॅब्रिस सँटोरो हा संघातील राखीव खेळाडू असणार आहे.
मारिया शारापोव्हासुद्धा या लीगचा भाग होणार असून, ती फिलिपाइन्सच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. २८ नोव्हेंबरला मनिला येथे लीगच्या सामन्यांना सुरुवात होणार असून १३ डिसेंबरला दुबईत समारोप होणार आहे.
स्पर्धेतील दिल्लीचा टप्पा इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमध्ये ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. भारत, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि फिलिपाइन्स या देशातील प्रत्येक संघ एकेरी सेटच्या पाच लढती खेळतील. लढतींचा क्रम यजमान संघ ठरवेल.
‘‘टेनिसपटूंचा लीगशी एक वर्षांचा करार असणार आहे. दुसऱ्या वर्षीपासून फ्रँचायजींना खेळाडूंची खरेदी-विक्री करण्याची मुभा असेल,’’ असे लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक गॉट्सचॉक यांनी सांगितले.