सोमवारी झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात एका निर्णयावरून मैदानावरील पंचांशी मतभेद दर्शवणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या चार चेंडूंमध्ये मुंबईला जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. त्या वेळी रोहित फलंदाजी करीत होता. पुण्याच्या युवा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने अखेरच्या षटकातील तिसरा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता. हा चेंडू वाइडच्या रेषेच्याही बाहेर पडल्याने रोहितने हा चेंडू सोडून दिला. पण पंच रवी यांनी हा चेंडू वाइड असल्याचा निर्णय दिला नाही. त्या वेळी रोहितने पंचांशी मतभेद असल्याचे दाखवले आणि तो पंच रवी यांच्याशी आक्रमकपणे बोलू लागला. या वेळी मैदानावरील दुसरे पंच ए. नंद किशोर यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि हा प्रकार थांबवला. यानंतर टाकण्यात आलेल्या चेंडूवर रोहित बाद झाला आणि मुंबईला तीन धावांनी सामना गमवावा लागला.

या साऱ्या प्रकारानंतर रोहितवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘रोहितने केलेले वर्तन हे क्रिकेटसारख्या खेळाला शोभणारे नाही. त्यामुळे सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे,’ असे आयपीएलने पत्रकात म्हटले आहे.