आयपीएलचं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम करणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ‘सातवे आसमां पर’ आहे. हैदराबादच्या स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने रायझिंग पुणे सुपरजायंटचा एका धावेने पराभव करून आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात रोमांचक विजय प्राप्त केल्यानंतर रोहितची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. रोहितने विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.

 

”आयपीएलचं तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. २०१३ आणि २०१५ या दोन्ही वर्षी अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्ज या एकाच संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. तुम्ही स्पर्धेची सुरूवात करण्यापूर्वी कशी तयारी करता यावर तुमचा स्पर्धेतील शेवट अवलंबून असतो असं मला वाटतं. वैयक्तिक हुशारीने तुम्हाला काही सामने जिंकता येतील, पण तुम्हाला चॅम्पियनशीपसाठी सांघिक कामगिरीनेच पुढे जावं लागतं.”, असे रोहित म्हणाला.

टीम इंडियाच्या टी-२० संघाचे कर्णधारपद भूषविण्याच्या संधीबाबतही विचारणा रोहितला करण्यात आली. भारताचे नेतृत्त्व करणं ही खूप पुढची गोष्ट आहे. मी पुढचा विचार करत नाही. पण संधी चालून आली तर नक्कीच दोन्ही हातांनी याचा स्वीकार करेन, असे रोहित म्हणाला.
महेंद्रसिंग धोनी कर्णधार पदावरून पायऊतार झाल्यानंतर भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले. कोहली सध्या टीम इंडियाच्या वनडे, टी-२० आणि कसोटी असा तिन्ही प्रकारात नेतृत्त्व करत आहे.