“द हिट मॅन इज बॅक” हो, टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याचे तब्बल चार महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. उजव्या मांडीच्या दुखापतीवर मात करून रोहित पुन्हा परतला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत असल्याची माहिती खुद्द रोहितने आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे.

 

न्यूझीलंडविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत रोहित शर्माच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती. रोहितच्या दुखापतीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या सक्तीच्या विश्रांतीनंतर रोहितने सरावासाठी सुरूवात केली होती. त्यानंतर आता पूर्णपणे फिट झाल्याची सुखद बातमी देत रोहित मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईचे येत्या ४ आणि ६ मार्च रोजी सामने खेळविण्यात येणार आहेत. या सामन्यांत खेळून रोहितला आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सरावादरम्यानचा फोटो पोस्ट करून पुन्हा सरावाला सुरूवात केल्याची बातमी दिली होती. मात्र, त्यावेळी रोहितने केवळ पूर्णपणे फिट नसल्याने काही फटके खेळण्याचा आनंद घेतला होता. मात्र नियमीत व्यायाम आणि पुनरागमनाचा ध्यास जपलेल्या रोहितने आता क्रिकेटमध्ये दमदार एण्ट्री करण्याची तयारी केली आहे.