भारतीय संघाचे दार मला पुण्यातील कनिष्ठ गटाच्या स्पर्धेद्वारे खुले झाले. त्यानंतर मी कधी मागे पाहिलेच नाही. साहजिकच पुण्याचे ऋण विसरणे अशक्य आहे, असे भारताचा सलामीवीर रोहित शर्माने येथे सांगितले. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीतील सरावामुळेच मला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविता आले, असे ऑलिम्पिक नेमबाज गगन नारंगने सांगितले.

क्रीडा क्षेत्रात असलेल्या संधीची ओळख सर्वाना व्हावी तसेच क्रीडाविषयक लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचे उद्घाटन शर्मा व नारंग यांच्या हस्ते झाले.  हे प्रदर्शन अशोकनगर भागातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवापर्यंत चालणार आहे.

‘‘भारतीय संघात स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पुण्यात मला १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील गटाच्या स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. सतरा वर्षांखालील गटाच्या सामन्यांमध्ये माझी कामगिरी सातत्यपूर्ण झाली व माझे भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न साकार झाले,’’ असे शर्मा याने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘बॅट कितीही चांगली असली परंतु एकाग्रता व आत्मविश्वास नसेल तर तुमच्याकडून अव्वल दर्जाची कामगिरी होऊ शकणार नाही. अर्थात बॅटीची निवड करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. काही वेळा चांगल्या दर्जाच्या बॅटी नसतील तर खेळताना अडचण येऊ शकते. साहजिकच आम्ही कारखान्यांमध्ये जाऊन आम्हाला कशा बॅटी लागतात हे सांगतो. त्यामुळे काही अंशी समस्या दूर होऊ शकते. एक दिवसीय सामन्यात २६४ धावांची खेळी केलेली बॅट मी अजूनही जपून ठेवली आहे. माझ्यासाठी तो संस्मरणीय ठेवा आहे.’’

संरक्षक साधनांबाबत रोहित म्हणाला, ‘‘हेल्मेट व अन्य संरक्षक साधनांचा उपयोग करणे ही आता नित्याचीच गरज आहे. काही वेळा अतिउत्साहाने युवा खेळाडू अशी साधने वापरण्याची टाळाटाळ करतात. ही प्रवृत्ती टाळावी.’’

‘‘कठोर मेहनत, खेळावरची निष्ठा व जबरदस्त इच्छाशक्ती असेल तरच आपण अव्वल दर्जाचे यश मिळवू शकतो. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला मला अपयश आले मात्र जिद्द न सोडता मी मेहनत करीत राहिलो, त्यामुळेच माझे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार झाले,’’ असे नारंग याने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘आता अत्याधुनिक रायफल्स आल्या आहेत. मात्र माझ्या आई-वडिलांनी घर विकून उभ्या केलेल्या पैशातून मी नेमबाजी स्पर्धेसाठी रायफल घेतली. ती रायफल मी अजूनही जपून ठेवली आहे. काही वेळा त्यावरही सराव करतो. कारण त्यामध्ये माझ्या आई-वडिलांच्या परिश्रमाचा पैसा आहे.’’

रोहित शर्माकडून गगन नारंगला शुभेच्छा

रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये नारंग याने पुन्हा पदक मिळवावे अशा शुभेच्छा देत रोहित याने आपली स्वाक्षरी असलेली बॅट नारंगला भेट दिली. यावेळी महापौर प्रशांत जगताप, डॉ. विश्वजित कदम, विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.