सातत्याने गोल करण्याची अद्भुत किमया साधणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मेस्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या बळावर बार्सिलोनासह बायर्न म्युनिक, पॅरिस सेंट जर्मेन, पोटरे संघांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सोळामध्ये आगेकूच केली.
मेस्सीने दोन गोल करत बार्सिलोनाच्या अजॅक्सवरील २-० विजयात निर्णायक भूमिका बजावली. या दोन गोलांसह चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील रौलच्या ७१ गोलच्या विक्रमाशी मेस्सीने बरोबरी केली. रौलने १४२ सामन्यांमध्ये रिअल माद्रिद आणि त्यानंतर शेल्कचे प्रतिनिधित्व करताना ७१ गोल केले आहेत. मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना ९० सामन्यांमध्येच ७१वा गोल नोंदवला आहे.
बायर्न म्युनिकने रोमावर २-० अशी मात केली. पॅरिस सेंट जर्मेनने अपोइलवर १-० असा विजय मिळवला. पोटरेने अ‍ॅथलेटिक बिलबाओला २-० असे नमवले. रिअल माद्रिद व बोरुसिया डॉर्टमंड यांनी याआधीच अंतिम सोळामध्ये स्थान मिळवले आहे.
२०१२मधील विजेत्या चेल्सीला या वेळी बादफेरीत पोहोचण्यात अपयश आले. चेल्सी आणि मारिबोर यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती.  यंदा स्पर्धेत इंग्लंडमधील क्लब्सना चांगली कामगिरी करता आलेली नाही. मँचेस्टर सिटीला रशियाच्या सीएसकेए मॉस्को संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सिटीप्रमाणे लिव्हरपूल आणि अर्सेनेल संघही पराभूत झाल्याने युक्रेनमधील शाख्तर डोनटस्क संघाचा अंतिम सोळामधला प्रवेश जवळपास नक्की झाला आहे.