गुजरात लायन्सविरुद्ध मुकाबला; आव्हान जिवंत राखण्यासाठी उर्वरित सहा लढतींत विजय अनिवार्य

पावसामुळे रद्द झालेला सामना, पराभवाची मालिका यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघासमोर इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या दहाव्या हंगामात प्राथमिक फेरीतच बाद होण्याची टांगती तलवार आहे. स्पर्धेतले आव्हान जिवंत राखण्यासाठी आतुर बेंगळूरुचा गुरुवारी गुजरात लायन्सशी मुकाबला होत आहे.

बेंगळूरुला उर्वरित सहाही लढतीत विजय मिळवावा लागणार आहे. बेंगळूरुची हैदराबादविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्याने बेंगळूरुची चिंता वाढली आहे. विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डी’व्हिलियर्स या त्रिकुटावर बेंगळूरुची भिस्त आहे. कोलकाताविरुद्धच्या लढतीत ४९ धावांत बेंगळूरुचा खुर्दा उडाला होता. त्या पराभवातून सावरत मोठी खेळी साकारण्यासाठी हे तिघेही उत्सुक आहेत. मनदीप सिंगला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. युझवेंद्र चहल, पवन नेगी आणि सॅम्युअल बद्री या फिरकी त्रिकुटाने धावा रोखणे आणि विकेट्स पटकावणे या दोन्ही आघाडय़ांवर चांगली कामगिरी केली आहे. मात्र टायमल मिल्स, श्रीनाथ अरविंद यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाज ताफ्यात असूनही बेंगळूरुचा संघ झगडताना दिसत आहे. गुजरातविरुद्ध दमदार विजयासह स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी बेंगळूरुचा संघ प्रयत्नशील आहे.

सुरेश रैनाला सूर गवसणे गुजरातसाठी जमेची बाजू आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम, आरोन फिंच आणि ड्वेन स्मिथ या तिघांवर संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी आहे. दिनेश कार्तिकचा अष्टपैलू खेळ गुजरातसाठी उपयुक्त आहे. बसील थंपीने आपल्या वेगाने तसेच अचूकतेने सर्वाना प्रभावित केले आहे. अ‍ॅण्ड्रय़ू टायकडून अपेक्षा आहेत. धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, रवींद्र जडेजा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ड्वेन ब्राव्हो स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने इरफान पठाणला गुजरातने संघात समाविष्ट केले आहे. बेंगळूरुविरुद्ध इरफान खेळण्याची शक्यता आहे. शिविल कौशिकऐवजी अंकित सोनीला संधी मिळू शकते.

गुजरात लायन्स

सुरेश रैना, अक्षदीप नाथ, शुभम अगरवाल, बसिल थम्पी, चिराग सुरी, मनप्रीत गोणी, इशान किशन, रवींद्र जडेजा, शदाब जकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार,  मुनाफ पटेल, प्रथम सिंग, सुरेश रैना, प्रदीप संगवान, जयदेव शाह, शेली शौर्य, नथ्थू सिंग, तेजस बरोका, इरफान पठाण, अंकित सोनी, अँड्रय़ू टाय, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, ब्रेंडन मॅक्क्युलम, जेसन रॉय, ड्वेन स्मिथ.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

विराट कोहली, सर्फराझ खान, सचिन बेबी, श्रीनाथ अरविंद, अवेश खान, स्टुअर्ट बिन्नी, युझवेंद्र चहल, अंकित चौधरी, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, मनदीप सिंग, पवन नेगी, हर्षल पटेल :: शेन वॉटसन, टायमल मिल्स, तबरेझ शम्सी, अ‍ॅडम मिलने, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, एबी डी’व्हिलियर्स, सॅम्युअल बद्री.