अवघ्या ४९ धावांत खुर्दा झालेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ अद्यापही त्या मानसिकतेत वावरत आहे. आयपीएलच्या बादफेरीचे आव्हान टिकवण्यासाठी त्यांची यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या कसोटीला उतरावे लागणार आहे. खुद्द पुण्यासाठीही विजय अनिवार्य असल्यामुळे गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी होणारी लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.

कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डी’व्हिलियर्स व पुणेकर केदार जाधव या फलंदाजांच्या तोफा झडताना पाहण्यासाठी येथील चाहते उत्सुक झाले आहेत. त्यामुळेच ३५ हजारांहून अधिक प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम उद्या ‘हाऊसफुल’ होईल असा अंदाज आहे. या सामन्याची सर्व तिकिटे यापूर्वीच संपली आहेत. सुट्टीच्या दिवशी बेंगळूरु-पुणे या दोन्ही संघांकडून आक्रमक टोलेबाजी पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकणार, हे त्यांच्या दृष्टीने कमी महत्त्वाचे आहे.

बेंगळूरु संघाने गेल्या ९ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. पुण्याविरुद्ध जर त्यांनी शनिवारी पराभव पत्करला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. उर्वरित पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. बेंगळूरु संघाकडे फलंदाजी व गोलंदाजीबाबत ख्यातनाम खेळाडूंची यादी असली तरी ती कागदावरच राहिली आहे.

बेंगळूरुच्या तुलनेत पुण्याची स्थिती बरी आहे. मात्र कामगिरीत सातत्य नाही हीच त्यांची समस्या आहे. मुंबई इंडियन्ससारख्या बलाढय़ संघावर मात केल्यानंतर त्यांना हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता आणि तोही घरच्या मैदानावरच आहे. पुणे संघाने ८ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून ८ गुणांची कमाई केली आहे. पुण्याच्या संघात कर्णधार स्टीव्हन स्मिथ, राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, मनोज तिवारी, आदी अनुभवी फलंदाज असले तरी कामगिरीत सातत्य नसल्यामुळे त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची एकत्रित चांगली कामगिरी होणे त्यांना गरजेचे आहे.

बेन स्टोक्स, अशोक दिंडा, जयदेव उनाडकत, इम्रान ताहीर, डॅनियल ख्रिस्तियन असे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत, मात्र क्षेत्ररक्षकांकडून योग्य साथ मिळाली पाहिजे.

बेगळूरु संघाच्या सर्व ‘वलयांकित’ फलंदाजांनी नैसर्गिक शैलीने खेळ केला तर प्रथम फलंदाजी करताना दोनशे धावांचा पल्ला ते गाठू शकतात. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. गोलंदाजीत श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, यझुवेंद्र चहल, सॅम्युअल बद्री, शेन वॉटसन यांच्यावर त्यांची मदार आहे.

पुण्याचे खेळाडू आमने-सामने

केदार जाधव व राहुल त्रिपाठी हे दोन्ही पुण्याचे खेळाडू येथे आमने-सामने खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. केदार हा बेगळूरु संघाकडून यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राहुल पुण्याकडून सलामीवीराची भूमिका बजावत आहे.