* बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात आज अंतिम फेरीचा सामना
* विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर लक्षवेधी
आतापर्यंतच्या चमकदार आणि लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही भारताच्या दक्षिणेतील संघांमध्ये आयपीएलची अंतिम फेरी रविवारी रंगणार आहे. बंगळुरूचा संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही, तर दुसरीकडे हैदराबादचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे पहिल्या-वहिल्या जेतेपदासाठी या दोन्ही संघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. आयपीएलच्या रणांगणातील या महायुद्धात नेमका कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना असून हा सामना त्यांच्यासाठी लज्जतदार मेजवानीसारखाच असणार आहे. बंगळुरूची फलंदाजी आणि हैदराबादची गोलंदाजी हे बलस्थान आहे, त्यामुळे हा सामना बंगळुरूचे फलंदाज आणि हैदराबादचे गोलंदाज यांच्यामध्ये रंगेल.
हैदराबादचा संघ २०१३ मध्ये आयपीएलमध्ये दाखल झाला, पण आतापर्यंत त्यांना एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. डेव्हिड वॉर्नरचे नेतृत्व आणि त्याच्याच धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे २००९ आणि २०११ साली बंगळुरूचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण दोन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशाच पडली. २००९ साली त्यांना डेक्कन चार्जर्स आणि २०११ साली त्यांना चेन्नई सुपर किंग्जने पराभूत केले होते. हे दोन्ही संघ दक्षिणेतलेच होते. आता तिसऱ्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाल्यावर तिसऱ्यांदाही त्यांच्यासमोर दक्षिणेतील संघाचेच आव्हान आहे. त्यामुळे या वेळी तरी बंगळुरूचा संघ जेतेपदाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

 

Untitled-11

 

गोलंदाजीमध्ये पारडे जड
बंगळुरूच्या फलंदाजीमध्ये जशी विविधता आहे तशीच हैदराबादच्या गोलंदाजीमध्ये दिसते. मुस्तफिझूर रेहमान हा युवा वेगवान गोलंदाज त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहे. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. पण या सामन्यात तो खेळला तर त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. त्याचबरोबर आयपीएलमध्ये ‘पर्पल कॅप’ भुवनेश्वर कुमारकडे आहे, आतापर्यंत त्याच्या नावावर सर्वाधिक बळी आहेत. बरिंदर सरणही चांगली गोलंदाजी करत आहे. बंगळुरूकडे गोलंदाजीमध्ये फक्त दोनच चांगले पर्याय आहेत. वॉटसनने आतापर्यंत भेदक मारा केला आहे. युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या हंगामात फलंदाजांना चांगलेच नाचवले आहे. त्यामुळे या दोघांवर बंगळुरूच्या गोलंदाजीची भिस्त असेल.

बंगळुरूची तगडी फलंदाजी
दोन्ही संघांच्या फलंदाजीवर नजर फिरवली तर हैदराबादपेक्षा बंगळुरूचे पारडे नक्कीच जड आहे. कर्णधार विराट कोहली, एबी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे क्रिकेट जगातील अव्वल फलंदाज बंगळुरूच्या ताफ्यामध्ये आहेत. क्रिकेट जगतामध्ये कोहलीसारखे सातत्य एकाही फलंदाजाकडे दिसत नाही. सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर त्याने या हंगामात सर्वाधिक धावा करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. डी’व्हिलियर्स हा एक अद्भुत फलंदाज आहे, जो फटके स्वत: बनवतो. अन्य फलंदाजाना जे फटके कठीण वाटतात, ते डी’व्हिलियर्स लीलया खेळतो. गेलसारखे जोरकस आणि गगनभेदी फटके कोणीही खेळताना दिसत नाही. त्यामुळे एकदा का गेल स्थिरस्थावर झाला तर बंगळुरूचा संघ धावांचा डोंगर नक्कीच उभारू शकतो. आतापर्यंत फक्त एक सामना सोडल्यास या तिघांपैकी अन्य फलंदाजांना संधीच मिळालेली नाही. अष्टपैलू शेन वॉटसनला फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. सध्याचा फॉर्म पाहता विराट कोहलीला बाद करणे, हे हैदराबादपुढील सर्वात मोठे आव्हान असेल. पण कोहलीनंतर डी’व्हिलियर्स आणि गेल यांना बाद करताना प्रतिस्पध्र्याची दाणादाण उडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहली आणि डी’व्हिलियर्स या जोडीचा धसका हैदराबादने नक्कीच घेतला असेल. कारण आव्हान कितीही मोठे असले तरी ते यशस्वी पाठलाग करू शकतात.
हैदराबादचा विचार केला तर वॉर्नरने फलंदाजीमध्ये एकहाती किल्ला लढवल्याचेच पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या ‘क्वालिफायर’ सामन्यामध्येही वॉर्नरनेच एकटय़ाच्या जिवावर संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. सलामीवीर शिखर धवनच्या बॅटला गंज लागल्याचेच दिसत आहे. युवराज सिंगला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही, त्याच्याकडून एकही विजयी खेळी पाहायला मिळालेली नाही. वॉर्नर वगळता एकाही फलंदाजाला छाप पाडता आलेली नाही.

 

Untitled-10

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ए बी डि’व्हिलियर्स, डेव्हिड विस, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस गेल, स्टुअर्ट बिन्नी, केन रिचर्डसन, सॅम्युअल बद्री, ट्रेव्हिस हेड, प्रवीण दुबे, विक्रमजित मलिक, इक्बाल अब्दुल्ला, सचिन बेबी, अक्षय कर्णेवार, विकास टोकस, के.एल. राहुल, परवेझ रसूल, अबू नचिम, हर्षल पटेल, केदार जाधव, मनदीप सिंग, सर्फराझ अहमद, एस. अरविंद, वरुण आरोन, युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद :
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, केन विल्यमसन, आदित्य तरे, रिकी भुई, ट्रेंट बोल्ट, मोइसेस हेनरिक्स, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, मुस्तफिझुर रेहमान, नमन ओझा, कर्ण शर्मा, युवराज सिंग, आशीष नेहरा, टी. सुमन, आशीष रेड्डी, बिपुल शर्मा, बेन कटिंग, भुवनेश्वर कुमार, इऑन मॉर्गन, विजय शंकर, बरिंदर सरण.

 

Untitled-9