शेवटच्या फेरीत सलोनी सापळे हिच्याकडून पराभूत होऊनही औरंगाबादच्या ऋतुजा बक्षी हिने महिलांच्या राज्य बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. अन्य खेळाडूंपेक्षा एक गुणाची आघाडी असल्यामुळेच तिला हे यश मिळविता आले. तिचे एकूण सहा गुण झाले.
या स्पर्धेत पर्णाली धारिया (मुंबई), सापळे (पुणे), धनश्री पंडित (मुंबई), समीक्षा पाटील (रायगड) व खुशी खंडेलवाल (मुंबई) यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दोन ते सहा क्रमांक देण्यात आले. वृषाली देवधर (मुंबई), स्नेहल महाजन, ऋतुजा कापडेकर (पुणे) व निती गुप्ता (मुंबई) यांनी अनुक्रमे सात ते दहा क्रमांक पटकाविले. शेवटच्या फेरीत ऋतुजा बक्षी व सलोनी सापळे यांच्यातील डावात सुरुवातीपासून चुरस होती. मात्र पाचव्या फेरीत एक गुणाची आघाडी असल्यामुळे ऋतुजाने या डावाकडे फारसे गांभीर्याने घेतले नाही. हा डाव तिने २९ चालींमध्ये गमावला. पर्णाली हिला समीक्षाने ४४ चालींमध्ये हरविले. खुशी हिने आशना माखिजा हिला ५५ चालींमध्ये पराभूत केले. धनश्रीने अवनी जोशी हिच्यावर ३२ चालींमध्ये शानदार विजय मिळविला.