सचिन तेंडुलकरमध्ये मोठी खेळी साकारण्याची क्षमता होती, पण त्याने आपल्यामधील गुणवत्तेला न्याय दिला नाही. त्यामुळे त्याला द्विशतक, त्रिशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या खेळी करता आल्या नाहीत, असे परखड मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
‘‘सचिन मुंबईमध्ये लहानाचा मोठा झाला. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंबरोबर त्याने जास्त वेळ घालवला. मुंबईचे खेळाडू हे तंत्रशुद्ध आणि सरळ बॅटने खेळायचे. पण त्याने जर सर विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबर जास्त काळ घालवला असता तर काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले असते,’’ असे कपिल म्हणाले.
सचिनबाबत कपिल पुढे म्हणाले की, ‘‘सचिन हा फारच चांगला क्रिकेटपटू होता. पण त्याला फक्त शतक झळकावणेच माहिती होते. त्यापुढे जाऊन द्विशतक, त्रिशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या खेळी कशा साकारायच्या, हे कधी त्याला उमगलेच नाही.’’
सचिन आणि रिचर्ड्स यांची तुलना करताना कपिल म्हणाले की, ‘‘सचिनकडे चांगली गुणवत्ता होती. तो तांत्रिकदृष्टय़ा सक्षम होता. पण फक्त शतक पूर्ण करण्यावरच त्याने लक्ष केंद्रित केले होते. रिचर्ड्स तसा कधीच नव्हता. रिचर्ड्स हा नेहमीच गोलंदाजांचा कर्दनकाळ वाटायचा. पण सचिनची गोलंदाजांवर तशी दहशत कधीच जाणवली नाही. सचिन हा कोणतेही नाव न ठेवण्यासारखा खेळाडू होता. जर मी त्याच्याबरोबर जास्त काळ घालवला असता तर त्याला सांगितले असते की, जा खेळाचा आनंद घे, वीरेंद्र सेहवागसारखा खेळ. त्याने जर असा खेळ केला असता तर तो अधिक चांगला क्रिकेटपटू झाला असता.’’