ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि भारताचा माजी विश्वविक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यापैकी श्रेष्ठ कोण, याबाबत अनेक चर्चा आणि वादविवाद घडले. परंतु क्रिकेटच्या मैदानातील या दोन महान हस्तींपैकी सर्वश्रेष्ठ कोण, हे अद्याप कोणी सिद्ध करू शकले नव्हते. परंतु चेन्नईतील एका लेखकाने ‘न्यायवैद्यक पुराव्यांच्या’ आधारे सचिन हा ब्रॅडमन यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा केला आहे.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पहिलावहिला आणि वयाचा ४१वा वाढदिवस गुरुवारी साजरा करीत आहे. परंतु त्याच्या पूर्वसंध्येला रुडोल्फ लॅम्बर्ट फर्नाडिस यांनी ‘ग्रेटर दॅन ब्रॅडमन’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात त्यांनी लिटिल मास्टर सचिन हा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘‘सचिन किंवा ब्रॅडमन यांचे हे आणखी एक चरित्र नाही किंवा आत्मचरित्रही नाही. तसेच यात मुलाखतींचा संग्रह, सामन्यांचे वर्णन किंवा तज्ज्ञांची मते वगैरे काही नाही. यात फक्त पृथक्करण आहे. परंतु यात थेट विक्रमांचा वेध घेणारा न्यायवैद्यक अभ्यास आहे,’’ असा दावा लेखक फर्नाडिस यांनी केला आहे.
ते पुढे म्हणतात, ‘‘हे पहिले आणि एकमेव पुस्तक आहे की, ज्यात ब्रॅडमन यांच्या फलंदाजीच्या स्थानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.’’
या पुस्तकाची प्रत सचिनचा भाऊ अजित, त्याची पत्नी अंजली आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना भेट देणार आहे, असे फर्नाडिस यांनी सांगितले. सचिनचे महानपण सिद्ध करण्यासाठी शास्त्र आणि मार्शल आर्ट्सचा आधार घेऊन चित्रे रेखाटण्यात आली आहे.