रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सदिच्छादूत होण्याचे भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) पाठविलेले निमंत्रण भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने स्वीकारले आहे. नेमबाज अभिनव बिंद्रा व सिनेअभिनेता सलमान खान यांचीही आयओएने सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे.
सलमानला सदिच्छादूत म्हणून नियुक्त केल्यानंतर आयओएवर भरपूर टीका झाली होती. ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू मिल्खासिंग व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी आयओएवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे आयओएने बिंद्रा, सचिन व संगीतकार ए.आर.रेहमान यांना सदिच्छादूत होण्यासाठी निमंत्रण पाठविले होते.
आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले, ‘सचिन याच्याकडून आमच्याकडे अधिकृत स्वीकृतीपत्र आले आहे. सचिनच्या नियुक्तीमुळे आम्हाला अत्यंत श्रेष्ठ व आदर्श खेळाडू प्रेरणास्थानी मिळाला आहे. देशात सर्वत्र क्रीडा क्षेत्राचा प्रसार करण्याची जबाबदारी या सदिच्छादूतांवर सोपविली जाणार आहे. पण संगीतकार रेहमान यांच्याकडून अद्याप होकार आलेला नाही.’
सचिनने ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. ‘ऑलिम्पिकसाठी निवड झालेले खेळाडू जागतिक दर्जाचे असतात व त्यांना शुभेच्छा देणे हे माझे कर्तव्य आहे. मी ट्विटर व फेसबुक आदी माध्यमांद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणारच आहे. परंतु प्रत्यक्ष त्यांना भेटल्यास मला जास्त आनंद होईल. गेली २४ वर्षे क्रिकेटद्वारे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच आहे. मी कायमच खेळाडूंच्या विकासाकरिता झगडलो आहे व खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्याचे कामही मी केले आहे,’ असे सचिनने आयओएला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागातील खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप कष्ट घेत असतात. तेच खरे सदिच्छादूत आहेत. जागतिक दर्जाच्या स्पर्धकांवर मात करण्यासाठी ते जे कौशल्य दाखवितात, त्याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अन्य युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या प्रगतीविषयी माहिती मला मिळत राहिली, तर ते मला निश्चित आवडेल.
– सचिन तेंडुलकर,
भारताचा माजी महान क्रिकेटपटू