मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानात फिरकीची जादू दाखवणारा कुलदीप यादव यांच्या क्रिकेटच्या प्रवासात एक साम्य आहे. ते म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि फिरकीपटू कुलदीप यादव दोघेही सुरुवातीच्या काळात जलदगती गोलंदाज होण्याचे स्वप्न बाळगून होते. सचिननं ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकटर डेनिस लिली यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यानं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. आज सचिनला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे.

सचिन प्रमाणेच क्रिकेटच्या मैदानात जलदगती गोलंदाजी करण्याचे स्वप्न कुलदीपनं पाहिलं होतं. पण त्याचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी कुलदीपला फिरकी गोलंदाजीवर भर देण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम करुन त्यानं प्रशिक्षकांचा सल्ला योग्य होता हे सिद्ध केलं. लेग स्पिनर शेन वॉर्नला गुरु मानणाऱ्या कुलदीपनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे शेन वॉर्नच्या शिकवणीचा देखील या हॅटट्रिकमध्ये मोलाचा वाटा असल्याचे कुलदीनं सामन्यानंतर सांगितलं. लहानपणापासूनच वॉर्नच्या गोलंदाजीनं प्रभावित झालेल्या कुलदीपला पुण्यातील कसोटी सामन्यात शेर्न वॉनला भेटण्याची संधी मिळाली होती. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामुळे ही भेट झाली होती. त्यानंतर वॉर्नने कुलदीपला मार्गदर्शनही केलं. हॅटट्रिकच्या तीन चेंडूत वॉर्नने दिलेल्या टिप्सचा वापर कल्याचं कुलदीपनं सामन्यानंतर एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक केल्यानंतर कुलदीपवर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्विटरवरुन कुलदीपचे अभिनंदन केले. सचिन आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे भारताला विजय मिळवता आला. विराट आणि अजिंक्यने चांगली फलंदाजी केली, असा उल्लेखही त्याने केला आहे.