ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दांडी गूल करणाऱ्या कूलदीप यादवच्या गोलंदाजीने खुद्द सचिन तेंडुलकरही प्रभावित झाला आहे. कुलदीपची वैविध्यपूर्ण गोलंदाजी बघून मी प्रभावित झालो आहे. तूझा खेळ बहरत राहो अशा शब्दात सचिनने कूलदीपचे कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कुलदीप यादव या डावखुऱ्या गोलंदाजाला भारतीय संघात संधी मिळाली. या संधीचे सोने करत कुलदीपने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट घेतल्या. कुलदीप यादवच्या गोलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर कूलदीपचे कौतुक केले. सचिन म्हणतो, कुलदीपची वैविध्यपूर्ण गोलंदाजी बघून मी प्रभावित झालो आहे. तूझा खेळ बहरत राहो आणि या सामन्यातील विजयाचा तू शिल्पकारही ठरु शकतो असे सचिनने म्हटले आहे. कुलदीपने मॅक्सवेलला त्रिफळाचीत केले. कुलदीपने ज्या पद्धतीने चेंडूला वळवून मॅक्सवेलला गंडवले ते बघून सगळेच थक्क झाले आहेत. रोहित शर्मानेही कुलदीपचे कौतुक केले आहे.

कुलदीप यादवसाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरला. पदार्पणातच कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स घेत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली अशा शब्दात महिला क्रिकेटपटू अंजूम चोप्राने कुलदीपला शाबासकी दिली.

संजय मांजरेकर यांनीदेखील कुलदीपविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तीन वर्षांपूर्वी मी कुलदीप यादवला अंडर १९ वर्ल्डकपमध्ये बघितले होते. मी तेव्हापासूनच चाहता झाला होतो. कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या कुलदीपला बघून चांगलं वाटलं असं मांजरेकर यांनी सांगितले.