ज्येष्ठ खेळाडूंच्या आगामी ट्वेन्टी-२० स्पर्धेबाबत स्पर्धेचे प्रवर्तक सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही स्पर्धा अमेरिकेत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
आयसीसीच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले,की सचिन व वॉर्न यांनी रिचर्डसन यांची भेट घेऊन त्यांना स्पर्धेची रुपरेषा समजावून सांगितली. तसेच हे सामने कोणकोणत्या ठिकाणी आयोजित केले जाण्याची शक्यता आहे याचाही तपशील त्यांनी दिला. या स्पर्धेस हिरवा कंदील देण्याचे अधिकार आयसीसीला नाहीत. अमेरिकन क्रिकेट मंडळाने त्यास परवानगी देण्याची आवश्यकता आहे. मात्र स्पर्धेच्या तांत्रिक नियमावलीबाबत आयसीसीचे मार्गदर्शन त्यांनी मागितले आहे व आयसीसीकडून त्यांना याबाबत मदत केली जाईल. हे सामने शिकागो, न्यूयॉर्क व लॉस एजेंलिस येथे होण्याची शक्यता आहे.