पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारताची माजी फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’विषयी चर्चा केली. या वेळी मोहिमेत सचिनने घेतलेल्या पुढाकाराबद्दल मोदींनी सचिनचे कौतुक केले आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत सचिनने एक गाव दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली असून मोदींनी त्याला मनापासून दाद दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियानासाठी निवडलेल्या नऊ व्यक्तींमध्ये सचिनचा समावेश होता. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झालेल्या या अभियानात सचिनने हातात झाडू घेऊन भाग घेतला होता. या मोहिमेसाठी आपण अनेक लोकांना सहभागी करून घेणार असल्याचे सचिनने या वेळी मोदींना सांगितले. या वेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजलीसुद्धा उपस्थित होती.
‘‘सचिनने सांसद आदर्श ग्राम योजनेनुसार एक गाव दत्तक घेण्याचा विचार केला आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांमधील क्रीडा विकासासाठी भरीव कार्य करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे,’’ असे केंद्र सरकारच्या पत्रकात म्हटले आहे.