क्रिकेटचा देव म्हणून संपूर्ण जगाने ज्याचा गौरव केला अशा भारतरत्न सचिन तेंडुलकरला तुम्ही स्वत:च्या हाताने कधी पत्र लिहीलं आणि सचिनेही त्याची दखल घेत ते ऑनलाईनला शेअर केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सचिनने आपल्या एका ‘जबरा फॅन’साठी अगदी असंच केलय. आपल्या चाहत्याने लिहीलेल्या पत्राची दखल घेत सचिनने चाहत्याचे आभार व्यक्त केले. तसेच त्याला शुभेच्छा देखील दिल्या.
सचिनचा येत्या २६ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या सचिन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यातून वेळ काढून सचिनने आपल्या चाहत्याचं पत्र सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्याचे कळवले.

”मी तुझा खूप मोठा चाहता आहे आणि मला मोठं झाल्यावर तुझ्यासारखं व्हायचं आहे. तुला पत्र लिहतोय याचा मला अभिमान आहे.”, असं अविनेश्वर अग्रवाल या चिमुकल्याने आपल्या पत्रात लिहीलं आहे. याशिवाय, चिमुकल्याने सचिनला आपल्या पत्रावर त्याच्या ऑटोग्राफसह प्रतिक्रिया देण्याचीही इच्छा व्यक्त केली.

सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे पत्र पोस्ट करून अविनेश्वर याला शुभेच्छा संदेश दिला. अविनेश्वर तू लिहीलेल्या पत्राबद्दल धन्यवाद. तुझं पत्र वाचून खरंच माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तुला खूप शुभेच्छा. मेहनत करत राहा, असं सचिनने आपल्या संदेशात म्हटलं आहे. इंस्टाग्रामवरील या पोस्टला अवघ्या दोन तासात ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Thank you for your letter, Avineeshwar! This really brought a smile on my face. My best wishes to you. Keep working hard!!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on