सचिन तेंडुलकर याच्यासारखी महान व्यक्ती कोणत्याही एका संघापुरता मर्यादित असत नाही. त्याच्याकडून मौलिक सूचना घेण्यासाठी सर्वच संघांतील खेळाडू उत्सुक असतात आणि या गोष्टीचाच प्रत्यय आयपीएल स्पर्धेच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळाला. सचिन हा जरी मुंबई इंडियन्सचा ‘आयकॉन’ असला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याची भेट घेतली. या वेळी सचिनने मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबरच कोहलीलाही मौलिक सल्ला दिला.
मुंबई व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर बुधवारी आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी सचिनने कारकीर्दीतील १९९वा कसोटी सामना खेळला होता. त्याचे येथे आगमन झाल्यानंतर स्टेडियमवर खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी हात उंचावत त्याचे स्वागत केले. मुंबई संघातील २६ खेळाडूंनी कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सराव केला. त्या वेळी सचिन याने त्यांना मार्गदर्शन केले.
मुंबईचा सराव सुरू असतानाच बंगळुरू संघातील खेळाडूंचे तेथे आगमन झाले. मुंबईचा सराव संपल्यानंतर कोहली याने सचिनबरोबर बराच वेळ चर्चा केली. बंगळुरू संघाची ११ एप्रिल रोजी कोलकाता संघाशी गाठ पडणार आहे.
या वेळी रोहित म्हणाला की, ‘‘सचिनने निवृत्ती स्वीकारली असली तरी तो आमच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. गेली सात वर्षे त्याने संघासाठी बहुमोल योगदान दिले आहे. जेव्हा आम्हाला त्याची आवश्यकता असते, तेव्हा तो आमच्यासाठी वेळ देतो.’’