भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात असला तरी कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच कितीतरी पटीने चांगला खेळाडू असल्याचे मत पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी व्यक्त केले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत युसूफ म्हणाले की, कोहलीला कमी लेखण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. कोहलीकडे फलंदाजीचे विलक्षण कौशल्य आहे. पण मी सचिन तेंडुलकर याच्याकडे कोहलीपेक्षा वरचढ खेळाडू म्हणून पाहातो. कारण सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंच्या दशकात सचिन खेळला. सध्याच्या खेळाडूंची गुणवत्ता ९० च्या दशकातील खेळाडूंसारखी नाही. मुख्यत्वे २०११ सालच्या विश्वचषकानंतर खेळाडूंची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येते. सचिन तेंडुलकर जागतिक दर्जाचा खेळाडू होता हे त्याच्या धावांच्या विक्रमावरून आणि शतकांवरून स्पष्ट दिसून येते. सचिनने ही कामगिरी त्या दशकातील सर्वोत्तम संघांविरुद्ध केली आहे.

मोहम्मद युसूफ यांनी पाकिस्तानकडून ९० कसोटी आणि २८८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ५२.२९ च्या तर एकदिवसीय करिअरमध्ये ४१.७१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. नुकतेच पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ३-० ने सपाटून मार खाल्ल्यानंतर युसूफ यांनी पाकिस्तानच्या संघाला फटकारले होते.

“सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ हा मला आतापर्यंतचा सर्वात कमकुवत संघ वाटतो. पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला ३-० ने मात द्यायला हवी होती. शेवटचे दोन्ही कसोटी सामने पाकिस्तानच्या संघाला सहजपणे ड्रॉ करता आले असते. पण फलंदाजीला पुरक खेळपट्टी असतानाही पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.”

पाकिस्तानच्या प्रशिक्षकांचे निरीक्षण देखील युसूफ यांनी यावेळी चुकीचे ठरवले. गोलंदाजांच्या वाईट कामगिरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले होते. पण युसूफ यांनी मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांना जबाबदार धरले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांत पराभवाला पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे जबाबदारी असल्याचे युसूफ म्हणाले.