ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी आशिष नेहराची निवड झाली. त्याच्या  निवडीबद्दल सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. युवा खेळाडूंना पसंती देणाऱ्या निवड समितीने वयाच्या ३८ व्या वर्षी नेहराला पुन्हा संधी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला याबद्दल अजिबात नवल वाटत नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या चाळीशीपर्यंत खेळल्याचे सांगत नेहराला दिलेल्या संधीचे सेहवागने स्वागत केले आहे.

क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. तुमचा फिटनेस आणि तुमची कामगिरी यावर संघातील स्थान अवलंबून असते. नेहरा धावांवर अंकुश ठेवून विकेट्स मिळवण्यात यशस्वी झाला, तर तो विश्वचषकातही खेळू शकतो, असे सेहवागने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी त्याने श्रीलंकन सनथ जयसुर्या वयाच्या ४२ वर्षी आणि सचिन तेंडुलकर चाळीसीमध्ये मैदानात उतरल्याचा दाखला देखील सेहवागने यावेळी दिला.

सेहवाग म्हणाला की, या मालिकेसाठी नेहराची निवडी झाल्याचे आश्चर्य वाटत नाही. त्याने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने जीममध्ये घाम गाळलाय. फिटनेस चाचणीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने दररोज आठ तास व्यायाम केल्याचेही सेहवागने यावेळी सांगितले. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी यो-यो चाचणीत पात्र व्हावे लागते. ही पात्रता त्याने सिद्ध आहे. या चाचणीत त्याने जवळपास कर्णधार विराट कोहलीच्या जवळपास गुण मिळवले आहेत, असेही सेहवाग म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ऑक्टोबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. या सामन्यात नेहराच्या गोलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल. नेहराला दुखापतीमुळे अनेकदा संघाबाहेर राहावे लागले आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध तो अखेरचा टी-२० सामना खेळला आहे.