राष्ट्रगीत प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असते. प्रचंड मैदानात, हजारो चाहत्यांच्या साक्षीने राष्ट्रगीत म्हणताना रोमांच उभे राहतात आणि उर अभिमानाने भरुन येतो असे उद्गार सचिन तेंडुलकरने काढले. नीलेश कुलकर्णी निर्मित्त ‘द स्पोर्ट्स हिरोज’ या क्रीडा गीताच्या अल्बम अनावरणप्रसंगी तो बोलत होता. भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा आणि २००३ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या वेळी राष्ट्रगीत म्हणतानाच्या भावना सचिनने उपस्थितांना ऐकवल्या. या कार्यक्रमाला हॉकीपटू धनराज पिल्ले आणि बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होते.
अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हिडिओत ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर, टेनिसपटू सानिया मिर्झा आणि महेश भूपती, हॉकीपटू धनराज पिल्ले, फुटबॉलपटू बायच्युंग भुतिया, ऑलिम्पिक पदकप्रात नेमबाज गगन नारंग आणि ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार यांनी राष्ट्रगीत म्हटले आहे.
‘दक्षिण आफ्रिकेत २००३ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी राष्ट्रगीत म्हणत असताना वेगळीच भावना निर्माण झाल्या. तब्बल ६० हजार चाहत्यांच्या बरोबरीने ‘जन गण मन’ म्हणणे हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रत्येकवेळी राष्ट्रगीत म्हणताना देशाविषयाची आनंद दुणावतो’, असे सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘२०११ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वीचा क्षण मी कधीही विसरणार नाही. स्टेडियममधील सर्व जण एकसुराने राष्ट्रगीताला साथ देत होते. खेळाडू नवेनवे विक्रम प्रस्थापित करतात. असंख्य जेतेपदे मिळवतात मात्र या सगळ्यापेक्षा राष्ट्रगीतावेळची भावना अनोखी असते’.