शारजामधील वाळूच्या वादळानंतरच्या सचिन तेंडुलकरच्या झंझावाताने क्रिकेट इतिहासात आपले स्थान मिळवले आहे. १९९८मध्ये भारताला तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचवणारी सचिनची ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची खेळी गाजली. शारीरिकदृष्टय़ा ती खेळी किती आव्हानात्मक होती, याचे महत्त्व सचिनने गुरुवारी अधोरेखित केले.

‘‘एप्रिल महिन्यात शारजामधील तापमान अतिशय जास्त असते. ही उष्णता तुम्हाला बूट आणि सॉक्समधूनही जाणवते. त्यामुळे शारजातून सामना खेळून दुबईतील निवासस्थानी पोहोचल्यावर पाय बर्फाच्या बादलीत टाकून बसावे लागायचे. वातावरणाच्या या आव्हानापलीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ त्या वेळी जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. त्यामुळे अशा दिग्गज संघाला हरवणे, हे अतिशय समाधान देणारे होते,’’ असे सचिनने सांगितले.

आयडीबीआय लाइफ इन्शुरन्सची मुंबई अर्धमॅरेथॉन २० ऑगस्टला होत आहे. या स्पध्रेचा सदिच्छादूत असलेल्या सचिनने आपले अनुभव सहभागी धावपटूंसमोर मांडले. शारजात झालेल्या कोका-कोला चषक क्रिकेट स्पध्रेत भारताने २२ एप्रिल १९९८ या दिवशी ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरी गाठली. मग २४ एप्रिलला सचिनच्या शानदार १३४ धावांच्या बळावर भारता ऑस्ट्रेलियाला पुन्हा हरवून विजेतेपद काबीज केले. या दोन सामन्यांबाबत सचिन म्हणाला, ‘‘माझा ४८ तासांचा खडतर अनुभव म्हणजे शारजामधील हे दोन सामने. पहिला सामना खेळून आम्ही दुबईतील हॉटेलला मध्यरात्री २ वाजता पोहोचला आणि त्यानंतर झोप घेतली. मग एका दिवसाच्या अंतराने पुढील दिवशी लगेच अंतिम सामना खेळणे हे मुळीच सोपे नव्हते.’’