आज देशभरात भारतीय हवाई दलाचा ८५ वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही या खास दिवशी हवाई दलाच्या जवानांना सलाम केला आहे. आतापर्यंत देशासाठी आपले प्राण देणाऱ्या हवाई दलाच्या जवानांना सचिनने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन खास सलाम केला आहे. स्थापना दिनाचं औचित्य साधून हवाई दल आजच्या दिवशी लढाऊ विमानांच्या कसरती करतं. गाझियाबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सचिननेही खास हजेरी लावली होती. हवाई दलाकडून सचिनला त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी Group Captain ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

अवश्य पाहा – फोटो गॅलरी: भारतीय हवाई दलाची मनमोहक प्रात्यक्षिके

आतापर्यंत युद्ध काळात हवाई दलाने भारताच्या हवाई सीमांचं रक्षण केलं असून, देशाचं स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा देश तुम्ही दिलेल्या बलिदानाला नेहमी लक्षात ठेवेल, अशा आशयाचा संदेश देणारा व्हिडिओ सचिनने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकरव्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हवाई दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम प्रश्नावरुन अनेकदा खटके उडत आहेत, यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी भारताचं हवाईदल दोन्ही सीमांवर लढण्यात सक्षम असल्याचं वक्तव्य केलं होतं.