वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणे व तयार करणे हा माझा आवडता छंद आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी माझ्या या छंदाकडे विशेष लक्ष देत आहे, असे भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याने सांगितले.
भारताचा द्रुतगती गोलंदाज झहीर खान याच्या टॉस स्पोर्ट्स लाउंजचे उद्घाटन सचिन याच्या हस्ते झाले. त्या वेळी सचिन म्हणाला, क्रिकेटची कारकीर्द सुरू असताना माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींवर खूप बंधने होती. त्या वेळी खाद्यपदार्थ बनविणे तर राहोच, पण मनापासून खाण्याचा आनंददेखील मी घेऊ शकत नव्हतो. आता मी या दोन्ही गोष्टींचा मनापासून आनंद घेत आहे अर्थात शारीरिक तंदुरुस्ती सांभाळूनच.
झहीरविषयी कौतुकास्पद उद्गार व्यक्त करताना सचिन म्हणाला,‘‘एका छोटय़ा गावातून आलेला हा अतिशय नैपुण्यवान गोलंदाज आहे. भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली आहे हे मी अगदी जवळून पाहिले आहे. अर्थात त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी हवी असेल तर त्याला थोडेसे डिवचावे लागते. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये त्याला स्थान आहे.’’
पुण्यातील आठवणींना उजाळा देत सचिन म्हणाला,की येथे मी पहिल्यांदा बारा वर्षांचा असताना एक सामना खेळलो होतो. पीवायसी जिमखाना येथे झालेल्या या सामन्यात मी धावबाद झालो. त्यानंतर मी खूप निराश झालो व पॅव्हेलीयनमध्ये रडलो. मुंबईचे मार्गदर्शक वासू परांजपे व मिलिंद रेगे यांनी माझी समजूत काढली. बाद होणे हा खेळाचाच एक भाग असतो हे त्यांनी पटवून दिले. ही शिकवण त्यानंतर मला माझी कारकीर्द घडविताना खूप उपयोगी पडली आहे.
झहीरच्या स्पोर्ट्स लाउंजमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन आदी विविध खेळांच्या थिम्सवर आधारित सजावट केली आहे.