सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी अद्यापही तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे, याचाच प्रत्यय येथील ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दिला. त्याच्या उपस्थितीमुळे हा सोहळा आकर्षक ठरला.
ग्रीनफिल्ड स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार समारंभाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेचा सदिच्छादूत असलेल्या सचिनचे स्टेडियमवर आगमन झाले, तेव्हा हजारो चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल हे या वेळी प्रमुख पाहुणे, तर केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या स्पर्धेला भरघोस यश मिळेल, अशा शब्दांत सोनवाल यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री ओमेन चंडी व खासदार शशी थरूर हेही या वेळी उपस्थित होते. प्रेक्षकांनी या भाषणापेक्षा विविध लोककलांच्या आविष्काराला मोठी दाद दिली. फटाक्यांच्या आतषबाजीने हा सोहळा अधिक आकर्षक ठरला.
राज्यातील अर्जुन पुरस्कार विजेत्यांनी क्रीडाज्योतीसह स्टेडियमवर फेरी मारली व ही ज्योत सचिनकडे सुपूर्द केली. सचिनने केरळची आंतरराष्ट्रीय धावपटू पी. टी. उषा व अंजू बॉबी जॉर्ज यांच्याकडे दिली, त्या वेळी प्रेक्षकांनी जल्लोष केला. उषा व अंजू यांच्या हस्ते स्टेडियमवरील मुख्य ज्योत प्रज्वलित केली.
स्टेडियममध्ये सुंदर सोहळा होत असताना स्पर्धेच्या अनेक क्रीडासुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांनाही त्याचा फटका बसला. प्रसारमाध्यम केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. अद्यापही अनेक स्टेडियमची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खेळाडू व संघटकांच्या तक्रारींनाच संयोजकांना सामोरे जावे लागत आहे.  
१५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांच्या संघांचे दहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.