भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे. या सर्वेक्षणासाठी २१व्या शतकातील १०० सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या सर्वेक्षणात तब्बल १६००० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २३ टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर १४ टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली. तब्बल दहा दिवस सुरु असलेल्या या सर्वेक्षणात २००० सालापासूनच्या कसोटी खेळाडुंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, लिटील मास्टर सचिनने या सगळ्यांवर मात करत अग्रस्थान पटकावले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या स्वत: जाहीर केलेल्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर होता. मात्र, सचिनने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस या सर्वेक्षणात काहीसे पिछाडीवर पडल्याची माहिती वेबसाईटकडून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.