मुंबई इंडियन्सकडून यंदा आयपीएलमध्ये खेळण्याचे मला भाग्य मिळत असले तरी माझ्या बडबडीमुळे आमच्या संघाचा सल्लागार सचिन तेंडुलकर हा कंटाळून जाण्याची शक्यता आहे, असे ‘धावांची मशिन’ ही बिरुदावली मिरवणाऱ्या माइक हसीने सांगितले.
हसी याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत होता. त्याला आता मुंबई संघाने करारबद्ध केले आहे व सचिन हा या संघाचा सल्लागार आहे. हसी म्हणाला, ‘‘दीड महिन्याच्या कालावधीत सचिनबरोबर मी असणार आहे. खूप बोलण्याची सवय आहे. त्यामुळे सचिनचा अनुभव जाणून घेण्याबाबत मी उत्सुक आहे. विशेषत: जीवन व क्रिकेट याचा संबंध हा माझ्या आवडीचा विषय असणार आहे. कदाचित माझ्या बडबडीमुळे तो आजारी पडण्याची शक्यता आहे.’’
मुंबईकडून खेळण्याबद्दल काय सांगता येईल, असे विचारले असता हसी म्हणाला, ‘‘मुंबई संघाकडून यापूर्वी अनेक महान खेळाडूंनी भाग घेतला आहे. त्यामुळे या संघाविषयी मला कमालीचा आदर आहे. अशा संघाकडून खेळण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी संस्मरणीय गोष्ट आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळणे मला खूप आवडते. यंदा पुन्हा मला ही संधी मिळणार असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा मी करून घेईन.’’