मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू सागर शहा याने जर्मनीत नुकत्याच झालेल्या झेडएमडीआय खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदाबरोबरच त्याने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला निकषही पूर्ण केला. सागर याने या स्पर्धेत क्लाऊस क्लीबेम्हटोर, ऑले बुकमन (जर्मनी), व्हॅचेस्लाव्ह झाखात्सोह (रशिया), पीटर अनरेदोव्ह (फिनलंड), अ‍ॅलेक्झांडर वेलेस्की (युक्रेन) या बलाढय़ खेळाडूंवर मात केली. तसेच त्याने तामस फिदोर, पेरेन्स बर्कीस (हंगेरी), जेन्स युवेमेवाल्ड (जर्मनी), मार्टिन क्राव्हेसीव्ह (युक्रेन) यांना बरोबरीत रोखले. सागर याने बर्कीस, फिदोर व झाखात्सोह यांच्यासमवेत प्रत्येकी सात गुण मिळविले. मात्र प्रगत गुणांच्या आधारे सागरला विजेतेपद बहाल करण्यात आले. सागर याने विजेतेपदाबरोबरच एक लाख ६० हजार रुपयांचे पारितोषिकही मिळविले. बर्कीस याला उपविजेतेपद मिळाले तर फिदोर व झाखात्सोह यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला.