कश्यप, मनू-सुमीत जोडी पराभूत

भारताची फुलराणी सायना नेहवालने गुडघ्याच्या दुखापतीची पर्वा न करता चांगला खेळ करत मकाऊ बॅडमिंटन ग्रां.प्रि. स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांमध्ये बी. साईप्रणीतनेही विजयी आगेकूच केली. मात्र पारुपल्ली कश्यप आणि मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.

सायनाने इंडोनेशियाच्या दिनार द्याह ऑयस्टिनवर १७-२१, २१-१८, २१-१२ असा विजय मिळवला. जागतिक स्तरावर अपरिचित दिनारने सायनाला पहिल्या गेममध्ये चकित केले. सुमारे तासभर चाललेल्या या लढतीत सायनाने पुढचे दोन्ही गेम जिंकत सामन्यावर कब्जा केला. पुढच्या फेरीत सायनाचा मुकाबला चीनच्या झांग यिमानशी होणार आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपला सूर गवसला नाही. तैपेईच्या लिन यू हसिनने कश्यपवर २१-१३, २२-२० अशी मात केली. दोन्ही गेममध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. मात्र लिनने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत बाजी मारली. विविध दुखापतींनी कश्यपला सातत्याने सतावले आहे.

पुरुष दुहेरीत डॅनी बावा ख्रिसान्ता आणि हेंद्रा विजया जोडीने मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीचा २२-२०, २१-१९ असा पराभव केला.