साईप्रणीतलाही तडाखा; भारताचे आव्हान संपुष्टात

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असतानाच खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या सायना नेहवालला मकाऊ बॅडमिंटन ग्रां.प्रि. स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाच्या बरोबरीने बी. साईप्रणीतही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक क्रमवारीत दहावरून नवव्या स्थानी आगेकूच करणारी सायना सरळ गेम्समध्ये पराभूत झाली. चीनच्या झांग यिमानने सायनावर २१-१२, २१-१७ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत २२६व्या स्थानी असणाऱ्या १९ वर्षीय झांगने पहिल्या गेममध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. तंदुरुस्त आणि कोर्टवर सर्वागीण वावर असणाऱ्या झांगने ही आघाडी ९-८ अशी वाढवली. या स्थितीतून झांगने सलग पाच गुणांची कमाई केली. ही आघाडी वाढवत झांगने पहिला गेम नावावर केला.

सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने पुनरागमन केले होते. मात्र या लढतीत दुखापतीमुळे तिच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे जाणवले. मात्र तरीही सायनाने ६-० अशी भक्कम आघाडी घेतली. झांगने तडफदार खेळ करीत  ७-७ अशी बरोबरी केली. झांगने ११-९ अशी आघाडी घेतली. सायनाने टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र झांगने चिवटपणे खेळ करीत बाजी मारली. पुरुष गटात चीनच्या झाओ जून पेंगने साईप्रणीतला २१-१९, २१-९ असे नमवले. पहिल्या गेममध्ये एकेका गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. मात्र दुसऱ्या गेममध्ये झाओने झंझावाती खेळासह सामन्यावर कब्जा केला.